मागे हटणं म्हणजे हार नव्हे...!
मागे हटणं म्हणजे हार नव्हे...!
आपल्याशी चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला त्याची जागा दाखवण्याची ताकद आपल्यात असते. शब्दांनी ठाम उत्तर देता येतं, वागणुकीतून प्रत्युत्तर देता येतं, आवश्यक असेल तर स्पष्ट सीमा आखता ही येतात. परंतु प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं, प्रत्येक प्रसंगी स्वतःला सिद्ध करणं, प्रत्येक वेळी वादात उतरून आपली बाजू पटवून देणं हेच सामर्थ्याचं लक्षण असतं असं नाही.
कधी कधी शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं.
जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं, कमी लेखतं, गैरसमज करतं किंवा अपमानित करतं, तेव्हा मनात भावनांचं वादळ उठतं. राग, दुःख, असहायता आणि स्वतःला योग्य ठरवण्याची तीव्र इच्छा. “मी चुकीचा नाही” हे ठामपणे सांगावंसं वाटतं. त्या क्षणी प्रत्युत्तर देणं सोपं असतं; पण थांबणं कठीण असतं.
जर आपण त्या क्षणी एक खोल श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि शांतपणे त्या ठिकाणाहून दूर जाण्याचा निर्णय घेतला.तर तो पराभव नसतो. ती स्वतःवर मिळवलेली जिंक असते. कारण आपण परिस्थितीवर नव्हे, तर स्वतःच्या भावनांवर विजय मिळवलेला असतो.
प्रत्येक लढाई लढायलाच हवी असं नसतं. काही लढाया न लढणं हाच खरा विजय असतो. कारण प्रत्येक संघर्ष आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतो. वेळ, ऊर्जा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मनःशांती.
जिथे आदर नाही, तिथे थांबण्यात अर्थ नसतो. सतत स्वतःला सिद्ध करत राहणं म्हणजे आपल्या किमतीचा निर्णय इतरांच्या हातात देणं होय. नातं टिकवण्यासाठी, कोणाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी, वारंवार झगडत राहणं. यातून शेवटी उरतो तो केवळ थकवा. समोरच्याला आपली चूक कळेलच, आपली किंमत उमगेलच, याची खात्री नसते; पण त्या प्रयत्नात आपण मात्र स्वतःशी तडजोड करत राहतो.
खरं धैर्य म्हणजे आवाज चढवणं नव्हे; तर योग्य वेळी शांत राहणं.खरं सामर्थ्य म्हणजे प्रत्युत्तर देणं नव्हे; तर स्वाभिमान जपण्यासाठी मागे हटणं.
शांतपणे दूर जाणं म्हणजे हार मानणं नव्हे. ती एक सजग निवड असते. स्वतःच्या मानसिक आरोग्याला, आत्मसन्मानाला आणि अंतःशांतीला प्राधान्य देण्याची. कारण कोणताही वाद आपल्या शांततेपेक्षा मोठा नसतो.
काही लोकांना तुमची किंमत कधीच कळणार नाही. काही नात्यांना तुमच्या शांततेचं मोल ही उमजणार नाही. पण प्रत्येकाला समजावून सांगणं, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं ही आपली जबाबदारी नसते. काही वेळा न बोलणं हेच सर्वात स्पष्ट आणि ठाम उत्तर असतं.
जी व्यक्ती प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देत नाही, प्रत्येक वेळी वादात उतरून स्वतःची बाजू मांडत नाही, ती घाबरलेली नसते; ती परिपक्व असते. ती निवड करत असते.
स्वतःच्या शांतीची,स्वतःच्या स्वाभिमानाची,आणि स्वतःच्या आनंदाची.
परिपक्वता म्हणजे नेहमी जिंकणं नव्हे. परिपक्वता म्हणजे कोणत्या प्रसंगी ठाम उभं राहायचं आणि कोणत्या वेळी शांतपणे मागे सरकायचं हे ओळखणं.
शांतपणे दूर जाणं म्हणजे स्वतःला हरवू न देण्याचा निर्णय. तो निर्णय स्वतःला जपण्याचा असतो.आणि शेवटी, आयुष्यातील सर्वात मोठं यश हेच जग काहीही म्हणो, परिस्थिती कितीही कठीण असो,स्वतःचा स्वाभिमान आणि अंतःशांती अबाधित राखणं.
हीच खरी ताकद.हीच खरी परिपक्वता.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा