माणूस न समजणारा सर्वात गुंतागुंतीचा विषय.....!
माणूस न समजणारा सर्वात गुंतागुंतीचा विषय.....!
कुणा विषयी जास्त विचार करू नका…कारण कितीही अभ्यास केला तरी पूर्णपणे न समजणारा विषय म्हणजे माणूस.माणसाचं मन समुद्रासारखं खोल असतं. बाहेरून ते शांत, साधं आणि सरळ वाटतं; पण त्या शांत पाण्याखाली किती वादळं दडलेली असतात, हे कधी कधी त्या समुद्रालाच माहीत नसतं. आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो, त्याचं बोलणं ऐकतो, त्याचं वागणं अनुभवतो आणि मग त्याच्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागतो. “तो असं का बोलला?”, “ती अशी का वागली?”, “त्यांनी माझ्याशी असं का केलं?” असे असंख्य प्रश्न मनात घर करून बसतात. पण जितका आपण या प्रश्नांचा विचार करत राहतो, तितकंच मन अधिक गुंतत जातं… आणि शेवटी थकून जातं.
खरं तर प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याच्या मनात वेगळ्या भावना असतात, वेगळे अनुभव असतात, आणि कधी कधी अशी वेदना असते जी तो कोणालाच सांगू शकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य, विचार आणि जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण समोरून पाहतो ते फक्त त्याच्या आयुष्याचं एक छोटंसं पान असतं; पण त्याच्या मनात एक संपूर्ण कहाणी दडलेली असते. त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणालाही पूर्णपणे समजून घेणं कधी कधी शक्यच नसतं.
पण तरीही आपण दुसऱ्यांना समजावण्याचा, त्यांना बदलण्याचा, त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत राहतो. आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत आणि समोरच्याने ते मान्य करावं. पण प्रत्येकाला आपलं सत्य योग्य वाटत असतं. त्यामुळे वाद वाढत जातात, पण समाधान मात्र मिळत नाही. शेवटी नात्यांपेक्षा अहंकार मोठा होतो आणि मनाची शांतता हरवून जाते.
जीवनात खरी शांतता हवी असेल, तर प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. कधी कधी शांत राहणं, काही गोष्टी दुर्लक्षित करणं आणि स्वतःला समजावणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. कारण जगातल्या प्रत्येक माणसाला आपल्या विचारांप्रमाणे वागायला लावणं शक्य नाही.
एक सुंदर उदाहरण आहे. संपूर्ण जगात कार्पेट टाकणं शक्य नाही; पण आपल्या पायात चप्पल घालणं मात्र खूप सोपं आहे.याच अर्थाने, आपण जग बदलण्याचा प्रयत्न करत बसलो तर आयुष्यभर अपूर्णच राहील. पण आपण स्वतःचा दृष्टिकोन बदलला, आपल्या अपेक्षा थोड्या कमी केल्या आणि मनाला समज दिली, तर जीवन खूप हलकं आणि शांत वाटू लागेल.
काही लोक आपल्याला कधीच पूर्णपणे समजणार नाहीत. काही नाती अपूर्ण राहतील, आणि काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. पण त्यासाठी सतत मनाला त्रास देत बसण्यात काहीच अर्थ नसतो. कारण जीवनाचा खरा आनंद वाद जिंकण्यात नसतो, तर मन शांत ठेवण्यात असतो.
कधी कधी काही गोष्टी सोडून देणं, काही प्रश्न अनुत्तरित राहू देणं आणि काही माणसांना त्यांच्या स्वभावासह स्वीकारणं हीच खरी आयुष्याची शहाणपणाची शिकवण असते. कारण आयुष्य खूप छोटं आहे… आणि त्यातला सर्वात मौल्यवान ठेवा म्हणजे मनाची शांतता.
म्हणूनच आयुष्यात कधी कधी जास्त विचार न करता फक्त इतकंच लक्षात ठेवा.सगळं जग बदलण्यापेक्षा स्वतःला थोडंसं बदलणं जास्त सोपं, सुंदर आणि समाधान देणारं असतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा