प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....!
प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....!
माणसाच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याचे मन. मन जर स्वच्छ, निर्मळ आणि प्रामाणिक असेल, तर माणूस जगात कुठेही उभा राहू शकतो. त्याला कोणाची भीती वाटत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात कोणताही खोटेपणा किंवा अपराधाची सावली नसते.
आजची दुनिया फार विचित्र आहे. इथे लोकांना सत्यापेक्षा अफवा जास्त आवडतात, आणि चांगुलपणापेक्षा दोष काढण्यातच जास्त आनंद मिळतो. कधी कधी तर परिस्थिती अशी होते की लोक देवालाही दोष देतात. आयुष्यात एखादी अडचण आली, स्वप्न अपूर्ण राहिले किंवा काहीतरी आपल्या मनासारखे झाले नाही, की लगेच लोक म्हणतात “देवाने असे का केले?” जणू प्रत्येक वेदनेचे उत्तर देवाकडेच आहे.
पण खरे पाहिले तर देवावर दोष ठेवणारी ही दुनिया माणसाच्या मनातील अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा तो दोष दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतो.कधी परिस्थितीवर, कधी नशिबावर आणि कधी देवावर.
म्हणूनच जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची शुद्धता जपणे. जर आपले विचार स्वच्छ असतील, हेतू चांगले असतील आणि आपण कुणाचे वाईट केले नसेल, तर जग काहीही बोलले तरी त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. कारण मनाला माहीत असते की आपण सत्याच्या मार्गावर आहोत.
जगाचे एक वैशिष्ट्य आहे.ते नेहमी बोलतच राहणार. आज ते तुमची स्तुती करेल, उद्या तुमच्यावर टीका करेल. लोकांच्या मतांनुसार आयुष्य जगायचे ठरवले, तर कधीच शांतता मिळणार नाही. म्हणूनच माणसाने जगापेक्षा आपल्या अंतःकरणाचे ऐकायला शिकले पाहिजे.
स्वच्छ मन असलेला माणूस रात्री शांत झोपू शकतो. त्याच्या मनावर कुठलाही भार नसतो. त्याला कोणाची भीती वाटत नाही, कारण त्याने कुणाला दुखावलेले नसते. त्याचे सत्य आणि त्याची प्रामाणिकता हेच त्याचे खरे बळ असते.
शेवटी आयुष्याचा खरा आनंद बाहेरच्या टाळ्यांमध्ये नसतो, तर आपल्या मनातील शांततेमध्ये असतो. जग काहीही म्हणो, लोक कितीही आरोप करो, पण जर मन स्वच्छ असेल तर माणूस नेहमी उंच उभा राहू शकतो.
कारण ही दुनिया अशी आहे की ती कधी कधी देवालाही दोषी ठरवते…पण निर्मळ मन असलेल्या माणसाला मात्र सत्य आणि प्रामाणिकतेचा आधार नेहमीच मिळत राहतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा