पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....!


पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....!

रंग बदलणाऱ्या माणसांत राहणे म्हणजे दररोज होळी खेळण्यासारखेच असते… पण ही होळी रंगांची नसते, ती भावनांची असते. इथे गुलाल उधळला जात नाही, तर विश्वास उधळला जातो. इथे पाण्याने रंग धुतले जात नाहीत, तर स्वार्थाने नाती धुऊन निघून जातात. प्रत्येक सकाळी आपण मनात आशेचा एक नवा रंग भरतो, आणि संध्याकाळी तोच रंग कुणाच्या खोटेपणामुळे फिका पडलेला दिसतो.

आजकाल माणसं परिस्थितीनुसार रंग बदलतात. समोर गोड बोलणारे लोक मागे कटू सत्य विणत असतात. चेहऱ्यावर मैत्रीचा मुखवटा, पण मनात स्वार्थाची गणितं. अशा वातावरणात जगताना मन कायम सावध राहतं. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणापासून अंतर राखावं, हेच कळेनासं होतं.आपण मात्र नात्यांचा,
प्रामाणिकपणाचा, आपुलकीचा रंग जपत राहतो.कारण आपल्याला रंग बदलता येत नाही; आपल्याला मन बदलता येत नाही.

बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो, जेव्हा पैशांच्या जोरावर गाढवं पुढे जातात. जेव्हा गुणवत्तेपेक्षा पैशाची किंमत जास्त ठरते, जेव्हा कर्तृत्वापेक्षा ओळखींचं वजन जड ठरतं, तेव्हा खऱ्या अर्थाने मेहनत करणारा माणूस क्षणभर थांबतो. त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात.“मी चुकीचा मार्ग निवडला का? सरळ राहून काही साध्य होतं का?”पण त्याच्या अंतःकरणात एक शांत आवाज असतो.जो सांगतो, “तुझा मार्ग कठीण आहे, पण तोच खरा आहे.”

पैसा माणसाला उंच व्यासपीठ देऊ शकतो, पण उंची देऊ शकत नाही. पैशांच्या जोरावर मिळवलेलं स्थान मोठं दिसतं, पण त्यात आत्म्याची ताकद नसते. ते यश झगमगाटात चमकतं, पण काळाच्या कसोटीवर टिकत नाही. कारण काळ हा सर्वात प्रामाणिक न्यायाधीश आहे. तो प्रत्येकाच्या कर्तृत्वाची खरी किंमत ठरवतो.

रंग बदलणारी माणसं क्षणभर तेजस्वी दिसतात.जसं होळीचे रंग काही दिवस भिंतींवर दिसतात. पण हळूहळू ते फिके पडतात. मात्र प्रामाणिकपणाचा रंग कधीच फिका होत नाही. कष्टाचा रंग घामात मिसळून अधिक गडद होतो. स्वाभिमानाचा रंग संकटातही उजळत राहतो.

जीवनात काही पराभव हे अपयश नसतात; ते आपल्या सहनशक्तीची परीक्षा असतात. ते आपल्याला लोकांच्या खऱ्या चेहऱ्यांची ओळख करून देतात. आणि त्या ओळखीमुळे आपण अधिक सजग, अधिक शांत, आणि अधिक मजबूत होतो. कारण एकदा का आपण खोट्या रंगांची ओळख पटवली, की पुन्हा ते रंग आपल्याला फसवू शकत नाहीत.

म्हणूनच, रंग बदलणाऱ्या माणसांत राहूनही स्वतःचा रंग बदलू नका. तुमचं मन स्वच्छ ठेवा, तुमची मूल्यं जपा. कारण शेवटी जिंकतो तोच जो स्वतःशी प्रामाणिक राहतो. पैशांच्या जोरावर पुढे गेलेले लोक कदाचित काही काळ गर्दीत उठून दिसतील, पण इतिहास नेहमी कर्तृत्ववानांचा मागोवा घेतो.

दररोजची ही होळी कदाचित मनाला थकवेल, कधी डोळ्यांत पाणी आणेल. पण तीच तुम्हाला अधिक सशक्त करेल. आणि एक दिवस असा येईल, जेव्हा तुमच्या प्रामाणिकतेचा रंग इतका गडद असेल की कोणत्याही खोट्या रंगाची त्यावर छाया पडणार नाही.त्या दिवशी तुमचा विजय गाजावाजा करणारा नसेल.पण तो शांत, स्थिर आणि खरा असेल.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !