मराठी गझलचे जनक गझल सम्राट सुरेश भट
गझल सम्राट सुरेश भट यांच्या दि.14 मार्च 2026 रोजी असलेल्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त लेख .
मराठी गझलचे जनक
गझल सम्राट सुरेश भट
दि.१४ मार्च २०२६ असलेल्या मराठी साहित्यातील महान कवी गझल सम्राट सुरेश भट यांना २३ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
मराठी साहित्यातील 'गझल सम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट यांनी मराठी गझलेला घराघरात पोहोचविले.गझल सम्राट सुरेश श्रीधर भट त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला साहित्याची आणि कवितेची प्रचंड आवड होती, ज्याचा प्रभाव सुरेश भट यांच्यावर बालपणापासूनच पडला.सुरेश भट यांचे बालपण इतर मुलांसारखे साधे नव्हते; त्यात शारीरिक आणि मानसिक संघर्षाचे पदर होते.लहानपणी त्यांना पोलिओ झाला होता. यामुळे त्यांचा उजवा पाय अधू झाला. या शारीरिक व्याधीमुळे त्यांना बालपणात बराच मानसिक त्रास सहन करावा लागला, पण याच वेदनेने त्यांच्यातील कवीला अधिक प्रगल्भ केले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अमरावतीतच झाले. त्यांना अभ्यासापेक्षा कविता आणि संगीताची अधिक आवड होती. त्यांच्या घरातूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला होता. स्वतः सुरेश भट उत्तम बासरी वाजवत असत, त्याचा उपयोग पुढे त्यांच्या गझलांना 'लय' प्राप्त करून देण्यात झाला.
सुरेश भट यांच्या कवितेचा प्रवास खऱ्या अर्थाने त्यांच्या कॉलेज जीवनात सुरू झाला असला, तरी त्यांच्या लेखणीतील धार आणि विद्रोहाची मुळे त्यांच्या बालपणातील संघर्षात दडलेली आहेत.सुरेश भट यांनी मराठी साहित्यात 'गझल' हा काव्यप्रकार अत्यंत लोकप्रिय केला. त्यांच्या लेखणीने शब्दांना धार दिली आणि मराठी गझलला जनसामान्यांपर्यंत पोहोचविले.
मराठी साहित्याच्या प्रांतात 'गझलसम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट हे केवळ एक कवी नव्हते, तर ते मराठी गझलेला घराघरात पोहोचवणारे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होते. त्यांनी उर्दूतील हा काव्यप्रकार मराठी मातीत इतक्या ताकदीने रुजवला की आज 'मराठी गझल' हा एक स्वतंत्र आणि समृद्ध प्रवाह बनला आहे.त्यांच्या गझल कार्याचे मुख्य पैलू म्हणजे मराठी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली .सुरेश भटांच्या आधीही काही कवींनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा आणि लोकप्रियता भटांनी मिळवून दिली. त्यांनी गझलेच्या वृत्त (बह्र) आणि तंत्रावर (काफिया-रदीफ) कमालीची हुकूमत मिळविली होती.त्यांच्या गझलेत आशय आणि विषयांची व्याप्ती होती .भटांच्या गझला फक्त प्रेम आणि विरहापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी गझलेतून सामाजिक बंडखोरी प्रस्थापित अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.राजकीय भाष्य केले .समाजातील दांभिकपणावर प्रहार केले.मानवी जीवनाचे गूढ उकलले.सुरेश भट यांनी मराठी कवितेत 'गझल' हा काव्यप्रकार अत्यंत प्रभावीपणे रूजविला. त्यांच्या शब्दांत जरब होती, तर स्वरात अथांग वेदना आणि प्रेम होते. त्यांच्या काही प्रसिद्ध रचना आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गायल्या जातात .त्यांच्या लेखणीतून उमटलेली प्रत्येक ओळ ही सामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. त्यांनी केवळ प्रेम कविताच लिहिल्या नाहीत, तर समाजातील अन्यायावर आपल्या शब्दांतून प्रहारही केले.
'रंग माझा वेगळा' या एका गझल संग्रहाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली .
या गझलसंग्रहाने मराठी साहित्यात इतिहास घडविला. "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा " या ओळीतून त्यांनी स्वतःची स्वाभिमानी आणि स्वतंत्र वृत्ती मांडली. त्यांच्या गझलांमधील 'शेर' हे सुभाषित असल्यासारखे चपखल असायचे.गझलचे लोकशाहीकरण आणि प्रसाराचे कार्य त्यांनी गझलेतून केले .सुरेश भटांनी केवळ स्वतः गझल लिहिली नाही, तर त्यांनी अनेक तरुण कवींना गझल लिहायला शिकविले.गझल कार्यशाळा स्वतः घेतल्या . त्यांनी महाराष्ट्रभर फिरून गझलेचे तंत्र समजावून सांगितले मार्गदर्शन केले .अनेक नवोदित गझलकारांना त्यांनी घडविले, ज्यामुळे आज मराठीत गझलकारांची एक मोठी फळी उभी आहे.त्यांच्या गझलांना हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांनी संगीत दिले आणि लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांसारख्या गायकांनी त्या अजरामर केल्या.
उदाहरणार्थ: "मलमली तारुण्य माझे", "केव्हा तरी पहाटे", "उष:काल होता होता" ,"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ". इत्यादी.
गझल सम्राट सुरेश भट यांचे अनेक गझल संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.' रूपगंधा 'या काव्यसंग्रहात सुरुवातीच्या काळातील समृद्ध कविता आणि गझल आहेत .'रंग माझा वेगळा' हा गझलेचा सुवर्णकाळ मांडणारा गझल संग्रह आहे . सामाजिक आणि विद्रोही जाणीवांचा आविष्कार म्हणजे 'एल्गार' तर गझलेतील विविध छटांचे दर्शन घडविणारा गझल संग्रह म्हणजे'सप्तरंग' होय. सुरेश भटांनी मराठी गझलेला "अभिजातता" आणि "लोकप्रियता" या दोन्ही टोकांचा संगम घडवून दिला. त्यांनी गझलेच्या माध्यमातून मराठी भाषेचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले आणि मराठी गझलला घराघरात पोहोचविले.अशा या महान गझल सम्राट सुरेश भट यांना दि.१४ मार्च २०२६ ला असलेल्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
सुरेश भटांचा । आज स्मृतिदिन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ॥
साहित्य माणिक राज्यस्तरीय
पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती.८०८७७४८६०९.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा