वाऱ्याची दिशा बदलली की ज्वालाही राख करते.....!


वाऱ्याची दिशा बदलली की ज्वालाही राख करते.....!

आग लावणाऱ्या लोकांना कधीच कळत नाही की ते नेमकं काय करत आहेत. कुणाच्या मनात संशयाची ठिणगी टाकणे, कुणाच्या नात्यांमध्ये मतभेदांची काडी लावणे, कुणाच्या शांत आयुष्यात अस्वस्थतेची ज्वाला पेटवणे… हे काहींना खूप सोपं वाटतं. त्यांना वाटतं की त्यांनी दुसऱ्याच्या आयुष्यात आग लावली आणि आता ते सुरक्षित आहेत.

ते विसरतात, आग ही कधीच कोणाची नसते. ती पेटली की तिचं स्वतःचं रूप धारण करते. सुरुवातीला ती दुसऱ्याच्या आयुष्यात धगधगते, नाती करपतात, विश्वास जळतो, मन राख होतं… आणि काही लोक दूर उभे राहून त्या जळत्या दृश्याकडे पाहत राहतात. त्यांना वाटतं, ही ज्वाला फक्त दुसऱ्यालाच जाळेल, पण आयुष्याचा वारा कधीच कायम एकाच दिशेने वाहत नाही.

एक दिवस असा येतो, जेव्हा वारा अचानक दिशा बदलतो. आणि जेव्हा तो बदलतो, तेव्हा ज्वाला मागे वळून पाहत नाही, ती सरळ त्या लोकांकडेच धावते ज्यांनी ती पेटवली होती. दुसऱ्याच्या आयुष्यात पेटवलेली आग कधी ना कधी स्वतःच्या घरापर्यंत पोहोचतेच. त्या वेळी ना शब्द उरतात, ना कारणं… फक्त राख उरते आणि पश्चात्ताप उरतो.

माणसांच्या मनात ज्वाला पेटवण्यापेक्षा त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारे बनणेच खरे धैर्य आहे. कारण द्वेषाने पेटवलेली आग कोणाचंही भलं करत नाही. ती आधी दुसऱ्याला जाळते आणि शेवटी स्वतःलाही राख करून टाकते.

वाऱ्याची दिशा बदलायला वेळ लागत नाही, आणि ज्वालांना माणसाला राख बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही.म्हणूनच, आयुष्यात कधीही आग लावणारे नव्हे, तर जखमा शांत करणारे बना. 

ही आग फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात जळत राहते असे वाटणे, हेच मानवी भूलभुलैय्या आहे; खरी ज्वाला ही स्वतःच्या दिशेने धावत असते, आणि ती संपल्यावर फक्त राख उरते. त्या राखीतूनच आपल्याला शिकवण मिळते द्वेष आणि नफरताने निर्माण केलेल्या ज्वालांना हात लावू नका.

माणूस आयुष्यात शांतीचं, सहानुभूतीचं, आणि प्रेमाचं दान देतो, तेच खरी ज्वाला आहे जी कधीही आपल्याला जाळत नाही.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !