हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....!
हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....! जीवनात सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मुखवट्यांमागचे चेहरे ओळखणे. कारण आजच्या धावपळीच्या, स्वार्थी जगात माणसं स्वतःपेक्षा भूमिका जास्त जगत आहेत. बाहेरून हसणारे चेहरे, गोड बोलणारी माणसं आणि आपुलकीचे शब्द… पण त्या सगळ्यामागे दडलेली भावना मात्र नेहमीच खरी असेल असं नाही. जो माणूस मुखवट्यामागचा खरा चेहरा ओळखतो, तो सावध होतो. तो कुणावरही लगेच विश्वास ठेवत नाही, शब्दांपेक्षा कृतीकडे पाहतो आणि स्वतःच्या मनाला जपतो. पण जो हे ओळखू शकत नाही, तो मात्र नात्यांमध्ये जास्त गुंततो, अपेक्षा वाढवतो आणि शेवटी फसवणूक, वेदना व निराशा यांचाच सामना करतो. आज अनेक नाती गरजेवर टिकलेली असतात. गरज संपली की आपुलकीचा मुखवटा आपोआप गळून पडतो. तेव्हा कळतं की आपण ज्या माणसाला आपलं मानत होतो, तो प्रत्यक्षात फक्त सोबत निभावत होता. अशा अनुभवातून माणूस आतून तुटतो, पण त्याच वेळी तो अधिक शहाणा ही होतो. माणसं ओळखता येणं ही जन्मजात मिळालेली देणगी नसते, ती अनुभवातून मिळते. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून, फसवणूक सहन करून, आणि अश्रूंनी धडे घेत आपण ही कला शिकतो. प्रत्येक वेदना...