निःस्वार्थ सेवेचा आरोग्यदूत: अनिल महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
निःस्वार्थ सेवेचा आरोग्यदूत: अनिल महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पाळधी गावातील अत्यंत साध्या आणि कष्टाळू कुटुंबात जन्मलेले अनिल आत्माराम महाजन, एक संयमी व सेवाभावी स्वभावाचे व्यक्तिमत्व, आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या शांत, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने पाळधी गावासह संपूर्ण परिसरात एक अपार आदर मिळविला होता. ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले. जीपीएस मित्रपरिवाराच्या माध्यमातून अनिल महाजन यांनी अनेक समाजोपयोगी कार्ये यशस्वीरित्या पार पाडली.
गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अनिल महाजन यांना अचानक त्रास जाणवू लागला. ही बातमी मिळताच प्रतापराव पाटील यांनी सर्व कार्य थांबवून त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला, आणि ना. पाटील यांनी त्यासाठी त्वरित व्यवस्था केली. मात्र दुर्दैवाने, रक्तात कॅन्सर असल्याचे निदान झाले. काहीच दिवसांत अनिल महाजन यांनी आपल्या कार्याला शेवटचा निरोप दिला.
"जो आवडे सर्वांना, तोच आवडे देवाला" या उक्तीप्रमाणे अनिल महाजन यांचे अकाली निधन हे अत्यंत वेदनादायक ठरले आहे. त्यांच्या जाण्याने जीपीएस मित्रपरिवार व पाळधीवासीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. प्रतापराव पाटील यांनी अश्रूंनी त्यांच्यावरची आत्मीयता प्रकट केली. अनिल महाजन यांचा प्रवास हा निष्ठा, समर्पण आणि समाजसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श होता. त्यांच्या जीवनातील विनम्रता, निःस्वार्थ सेवा आणि सहृदयता हे गुण समाजासाठी प्रकाशस्तंभ होते.
त्यांच्या जाण्याने पाळधी परिसरातील अनेक गरजू लोकांनी एक आपला आधार गमावला आहे. अनिल महाजन यांची उपस्थिती ही अनेकांसाठी आधाराची होती. त्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजसेवा केली. त्यांच्या कष्टाने आणि परिश्रमाने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला. त्यांच्या कार्याचा व सेवाभावी वृत्तीचा आठवण पाळधीवासीयांच्या हृदयात कायम राहील.
त्यांच्या अमूल्य कार्याची आणि सेवा वृत्तीची आठवण ठेवून, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
© शब्दांकन:दीपक पवार (संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा