सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श: अशोक रामचंद्र मोरे (भोई)


सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श: अशोक रामचंद्र मोरे (भोई)

एरंडोल येथील अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अशोक रामचंद्र मोरे (भोई) हे खऱ्या अर्थाने संघर्षातून स्वतःचा मार्ग शोधणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या वडिलांचे सालदारकीचे काम आणि कुटुंबाची हलाखीची परिस्थिती यामुळे त्यांचे बालपण खडतर गेले. मात्र, अशोकजीच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व माहित असल्याने त्यांनी मोलमजुरी व सालदारकी करत आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले आणि पदवीधर झाले. यशाची वाटचाल करत असताना,त्यांनी सामाजिक कामाची आवड कधीच कमी होऊ दिली नाही.

बालपणापासूनच त्यांना समाजसेवेची गोडी लागली होती. 1990 साली जळगाव जिल्हा भोई समाजाचा जिल्हा मेळावा एरंडोल येथे घेऊन,त्यांनी आपली सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवून दिली. त्यानंतर 1989 साली,वडिलांच्या पुण्याईने आणि तत्कालीन नगराध्यक्ष मुकुंद दादा परदेशी व नगरसेवक पुंडलिक भाऊ वाल्डे यांच्या सहकार्याने त्यांना एरंडोल नगरपालिकेमध्ये जकात कारकून म्हणून नोकरी लागली. मात्र सरकारी नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कधीही शेती किंवा सामाजिक कामाकडे दुर्लक्ष केले नाही.

अशोकजी नगरपालिकेत नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देतात. त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळे अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवले गेले आहेत.नगरपालिकेच्या कामगारांबद्दल ते विशेष संवेदनशील आहेत.कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ नये यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कामगारांच्या हक्कांसाठी ते नेहमीच कणखरपणे उभे राहतात.

या सर्व कामांमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाचा तितकाच सांभाळ केला. लहान भावांना शिकवून, त्यांना योग्य आधार दिला.त्यांच्या मुलांनीही शिक्षणात प्रगती केली आहे आणि ते इंजिनिअर व एम.फॉर्म्स ही पदवीधर आहेत.इतकेच नव्हे, तर त्यांच्या भावांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतही ते जागरूक आहेत.यावरून त्यांच्या कुटुंबाबद्दलची बांधिलकी स्पष्ट होते.

सामाजिक कार्य करताना,अशोक मोरे हे भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सहसचिव म्हणून काम करत आहेत. कामगारांच्या हितासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याऱ्या संघटनेत त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे,भोई समाजाच्या जिल्हा कार्यकारणीमध्येही त्यांची सक्रिय भूमिका आहे. समाजाच्या कल्याणासाठी ते अहोरात्र झटत असतात.

अशोक रामचंद्र मोरे यांचे जीवन हे एक उदाहरण आहे की,कष्ट आणि सामाजिक बांधिलकी यांनी आपली ओळख घडवता येते.आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेने त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.त्यांच्या संघर्षमय जीवनातून मिळालेली शिकवण इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.

© शब्दांकन:दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !