शून्यातून विश्व उभं करणारे अशोक हिरामण सातपुते
शून्यातून विश्व उभं करणारे अशोक हिरामण सातपुते
धरणगाव तालुक्यातील शामखेडे या छोट्याशा गावात जन्मलेले अशोक हिरामण सातपुते यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोकजींचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. वडील शेतीतील कष्ट करत असताना पाहून त्यांना लहानपणापासूनच हे जाणवले की, जीवनात प्रगती साधायची असेल तर कठोर मेहनतीशिवाय दुसरा मार्ग नाही.
ही जाणीवच त्यांच्या आयुष्याचा पाया ठरली. शिक्षण नसल्यामुळे त्यांना मोठ्या संधी मिळाल्या नाहीत, परंतु मेहनतीच्या मार्गाला त्यांनी कधीच वळसा घातला नाही. वडिलांना शेतीत मदत करतानाच त्यांनी दुसऱ्यांकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणूनही काम केले. शिक्षण न मिळाल्याची खंत त्यांच्या मनात होती, परंतु त्यांच्या मुलांना आणि भावंडांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.
अशोकजींनी फक्त मेहनतीने आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली नाही, तर मुलांमध्ये आणि भावांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजवले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज त्यांचे सुपुत्र संदीप सातपुते पोलीस दलामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. संदीप यांचे यश हे अशोकजींच्या कष्टाचे मूर्तिमंत फळ आहे. आपल्या मुलांच्या यशातच त्यांनी आपले स्वप्न साकार झाल्याचे पाहिले.
अशोक हिरामण सातपुते हे साधेपणाचे आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहेत.त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करून कुटुंबाला उन्नतीच्या मार्गावर नेले. संघर्षातून यशाचा मंत्र त्यांनी आपल्या कुटुंबीयांना शिकवला. त्यांच्या साध्या आणि सच्च्या स्वभावामुळे ते गावात आणि परिसरात सर्वांनाच प्रिय होते.
आज अशोकजींच्या संघर्षाची आणि जिद्दीची आठवण कुटुंबीयांसह संपूर्ण समाज घेत आहे. त्यांच्या संघर्षाची गाथा आजच्या पिढीला प्रेरणा देणारी ठरते.
अशोक हिरामण सातपुते यांचे जीवन म्हणजे जिद्द, संघर्ष आणि कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची एक अमूल्य कथा आहे. त्यांच्या संघर्षाला आणि यशाला भावपूर्ण अभिवादन!
©शब्दांकन:दीपक पवार(संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा