नात्यांचा आभास: जसं दिसतं तसं नसतं
नात्यांचा आभास: जसं दिसतं तसं नसतं
जगाचं हे अगदी योग्य निरीक्षण आहे, "जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं." हीच स्थिती नात्यांच्या बाबतीत अनुभवायला मिळते. नातं म्हटलं की, विश्वास, आधार आणि प्रेम यांची अपेक्षा असते. मात्र, अनेकदा हे नातं वरवरचं, आभासी आणि फसवं वाटतं. समोरून आपलं असं भासवणारे काही नातलग मागून आपल्या आयुष्याला उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असतात.
घरातले छोटे वाद, तंटे किंवा मतभेद मिटवण्याऐवजी काही नातलग त्यात तेल ओतून त्या वादांना अधिकच उफाळून आणतात. साध्या गोष्टीतून मोठं भांडण उभं करण्याचं त्यांचं कौशल्य असतं. त्यांचे सल्ले वरवर हितचिंतकांसारखे वाटत असले तरी त्यामागे त्यांच्या स्वार्थाचं पक्कं गणित दडलेलं असतं.
आपल्या प्रगतीचा सुगावा लागताच त्यांच्या मनात मत्सर निर्माण होतो. आपल्या यशाला कसं ग्रहण लागेल, याचाच विचार ते करत असतात. आपण यशस्वी होत असताना ते त्यांच्या पचनी पडत नाही. उलट, आपल्यावर संकट आलं, अपयश पाठी लागलं, किंवा दु:खाचा डोंगर कोसळला, तर त्यांना त्यात समाधान मिळतं.
खरं पाहता, कठीण प्रसंगात आधार देणारे बहुतेक वेळा बाहेरचेच लोक असतात. रक्ताचं नातं असलेले नातलग मात्र केवळ टोमणे मारण्यात, कुचकट बोलण्यात आणि आपल्या अपयशाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त असतात. त्यांच्या शब्दांमध्ये मधाळपणा वाटला तरी त्यामागे नेहमीच मत्सर आणि नकारात्मकता दडलेली असते.
अशा विषारी नात्यांच्या प्रभावाखाली राहणं म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रगतीवर पाणी सोडणं होय. कारण अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असतात, आणि त्यांचा स्वभाव कधीच बदलणार नसतो. त्यामुळे त्यांना प्रतिसाद देण्याऐवजी, आपली ऊर्जा आणि लक्ष आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आणि प्रगतीसाठी वापरणं योग्य ठरतं.
आयुष्य आपल्याला हे शिकवतं की नात्यांपेक्षा माणुसकी मोठी असते. ज्या लोकांना तुमचं दु:ख पाहण्यात आनंद होतो, ते तुमचे नसतातच. खरं नातं कधीच रक्ताच्या नात्याने सिद्ध होत नाही, तर माणसाच्या कृतीतून दिसतं. आपल्यासाठी निःस्वार्थपणे उभे राहणारे कधी कधी परकेच असतात.
म्हणूनच, अशा नकारात्मक नात्यांपासून दूर राहा. स्वतःच्या स्वप्नांकडे आणि प्रगतीकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने उभे रहा, आणि जिथं खरं प्रेम, आदर आणि सहकार्य मिळतं, तिथंच आपलं मन गुंतवा. आयुष्य खूप सुंदर आहे. अशा फसव्या नात्यांच्या खेळात वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीच्या बळावर यशाचं शिखर गाठा.
कारण शेवटी, तुम्ही प्रामाणिक राहून स्वतःसाठी उभे राहाल, तेव्हाच खरा आनंद आणि समाधान मिळेल!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा