आनंद आणि समाधान: निस्वार्थ सेवेचे खरे सौंदर्य
आनंद आणि समाधान: निस्वार्थ सेवेचे खरे सौंदर्य
आनंद आणि समाधान या गोष्टी प्रत्येक माणसाला आयुष्यात हव्या असतात. पण त्या बाहेर कुठेही सापडत नाहीत, तर आपल्या अंतःकरणातूनच उलगडतात. देवाने आपल्याला आयुष्यात जे काही दिलं आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहणं, हीच खऱ्या अर्थाने त्याची पूजा आहे. मात्र कृतज्ञता म्हणजे फक्त देवाला फुले वाहणं, नवस बोलणं किंवा दक्षिणा देणं नव्हे.
खऱ्या अर्थाने देवकार्य करायचं असेल, तर ते गरजूंना मदत करण्याच्या भावनेतूनच होतं. समाजातील जे उपेक्षित, रंजले-गांजले आहेत, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी पुढे आलात, तरच ती खरी देवपूजा ठरते. अशा व्यक्तींचं दुःख हलकं करणं, त्यांना मदतीचा हात देणं, हेच आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने साध्य असायला हवं.
तुमच्याकडे असलेल्या संपत्तीतील काही भाग जर गरजू लोकांसाठी वापरला, तर त्याने संपत्ती कमी होत नाही, उलट ती वाढते. दिल्याने होणारा आनंद आणि समाधान हे भौतिक सुखांपेक्षा कितीतरी पटींनी मोठं असतं. गरजूंना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं, हीच खरी आत्मिक तृप्ती आहे.
निस्वार्थ भावनेने दिलं जाणं केवळ दुसऱ्याला उपयोगी पडतं असं नाही, तर ते देणाऱ्याच्या आत्म्याला शांतता आणि समाधान मिळवून देतं. आपण निरपेक्षपणे दिलेलं दान केवळ गरजवंताचे जीवनच बदलत नाही, तर देणाऱ्यालाही एका उंचीवर नेऊन ठेवतं.
समाजातील गरजूंना मदत करताना आपल्याला आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने महत्त्व कळतं. देणाऱ्याने समाधानाने दिलं आणि घेणाऱ्याने समाधानाने घेतलं, तर दोघांच्याही आयुष्यात आनंद आणि समाधान स्थिरावतं.
खरा आनंद मिळवायचा असेल, तर तो दुसऱ्याच्या आयुष्यात आणा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलेला समाधानाचा क्षण आपल्याला आयुष्यभर पुरेल. तोच खरा आनंद आहे, आणि तीच खरी साधना आहे.
"देण्यातून आत्मिक समाधान आणि समाधानातून खरा आनंद मिळतो, हे प्रत्येकाने अनुभवायला हवं."
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा