बाप: न ओळखला जाणारा त्यागाचा झरा
बाप: न ओळखला जाणारा त्यागाचा झरा
घराच्या चार भिंतींमध्ये ज्या व्यक्तीच्या कष्टांनी घराचं अस्तित्व टिकून असतं, ती व्यक्ती म्हणजे बाप. त्याचं आयुष्य म्हणजे न संपणारा त्याग, निस्वार्थ सेवा, आणि न बोलता व्यक्त होणारं प्रेम. बापाच्या प्रत्येक कृतीत त्याच्या मुलांसाठी असलेली निस्सीम माया लपलेली असते, पण ती सहज कधीच ओळखली जात नाही.
बापाचं आयुष्य म्हणजे एक संघर्ष. तो कधी अंगावर वळ बसवून कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवतो, तर कधी स्वतःच्या गरजांवर पाणी सोडून मुलांच्या स्वप्नांना पंख देतो. मुलांच्या गरजा भागवताना स्वतःला विसरणारा बाप, त्याच्या भावना मनात ठेवून सतत झटत राहतो.
कठोरतेच्या मुखवट्यामागे बापाचं मऊसूत मन असतं. तो कधी रागावतो, कधी मुलांना वळण लावतो, पण त्या रागामागे असते मुलांच्या भविष्याची काळजी आणि त्यांच्या सुखासाठी असलेली धडपड. त्याच्या रागाला जखम समजण्याऐवजी त्यातलं औषध ओळखायला हवं.
बाप हा कधीच थकत नाही, अडचणी सांगत नाही, किंवा थांबत नाही. त्याला हे सगळं परवानगीच नसतं, कारण त्याचं थांबणं म्हणजे कुटुंबाचं थांबणं. पण ज्या माणसाने आयुष्यभर कुटुंबासाठी स्वतःला झिजवलं, त्याला म्हातारपणी कोपऱ्यात बसण्याशिवाय पर्याय नसतो. अंगणात झाडाखाली एकटा बसून आठवणींमध्ये रमलेला बाप कधी आपल्या दुःखाचं ओझं व्यक्त करत नाही.
बापाला ओळखायला हवं. त्याच्या प्रत्येक कष्टामागे, त्याच्या कठोरतेमागे, आणि त्याच्या गप्प राहण्यातून ही त्याचं निस्सीम प्रेम दिसतं. बापाला न ओळखणं म्हणजे त्याच्या आयुष्यभराच्या त्यागाला नाकारण्यासारखं आहे.
बाप हा फक्त घराचा आधार नाही; तो आयुष्याला दिशा देणारा दिवा ही आहे. त्याच्या कष्टांचं मोल फक्त तो जाई पर्यंत कळतं, आणि तेव्हा उशीर झालेला असतो. म्हणूनच बापाचं मोल वेळेवर ओळखा, त्याच्या त्यागाची जाणीव ठेवा, आणि त्याच्या प्रेमाला स्वीकारा.
बाप म्हणजे एक भावना, जिचं मोल जगण्याच्या प्रत्येक क्षणाला जाणवायला हवं.
© शब्दांकन:दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा