स्वतःच्या ध्येयासाठी संघर्ष करत राहा
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग १९
*स्वतःच्या ध्येयासाठी संघर्ष करत राहा !
जीवन म्हणजे संघर्ष आणि आव्हानांनी भरलेली वाटचाल. प्रत्येक नवीन दिवस आपल्या समोर नवे प्रश्न, नवी आव्हानं उभी करतो. अशा कठीण क्षणी अनेकदा मनात विचार येतो – आपण हे सगळं झेलू शकतो का? पण अशा वेळी एक गोष्ट आपल्याला पुन्हा उभं करण्याची ताकद देते – ती म्हणजे आपलं ध्येय. ध्येय म्हणजे जीवनाचा आधारस्तंभ. त्याच्या प्रेरणेनं आपलं मनोबल कधीच खचत नाही.
लहानपणापासूनच मी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत होता. शाळेत जाण्यासाठी पायी चालावं लागायचं; अभ्यासासाठी पुस्तकं, साधनं कमी पडायची. तरीही, स्वप्नं उराशी बाळगून मी धडपडत राहिलो. कधी कधी वाटायचं, “सगळं सोडून द्यावं.” पण माझ्या ध्येयाचा आवाज नेहमी म्हणायचा, “थांबू नकोस. पुढं चालत राहा. यश तुझी वाट पाहतंय.”
प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे असतात. ते आपल्या ताकदीची परीक्षा घेतात. संयम, जिद्द आणि चिकाटी या गुणांना परखून पाहतात. मीसुद्धा अपयशाचा अनुभव घेतला. कधी मित्रांची चेष्टा, कधी नातेवाईकांचे टोमणे – अशा प्रसंगांनी मनाला खूपच ठेच पोहोचली. पण ध्येय हे माझ्यासाठी जणू प्रकाशाचा किरण होतं. त्या तेजानं मला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवला.
ध्येय हे केवळ स्वप्न नसतं, तर ते आयुष्याला दिशा देणारं प्रेरणास्थान असतं. जेव्हा एखाद्या ध्येयासाठी झपाटून काम केलं जातं, तेव्हा कितीही अडथळे आले तरी मन डगमगत नाही. अडथळ्यांच्या रस्त्यावर चालताना कधी थकवा जाणवतो, कधी हार मानावीशी वाटते. पण त्याच वेळी ध्येयाचा विचार मनाला नवचैतन्य देतो. “थांबू नकोस, अजून थोडा संघर्ष कर,” असं ते सतत सांगत राहतं.
इतिहासातल्या यशस्वी लोकांच्या कथा वाचल्या की, लक्षात येतं की, त्यांच्या आयुष्यालाही संघर्षाचा स्पर्श झाला होता. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी असंख्य संकटांना सामोरं गेलं. थॉमस एडिसन यांनी बल्ब तयार करताना हजारो अपयश झेलली. खेळाडूंनी पराभवाच्या खचाखच वाटेतून विजयाचा मार्ग शोधला. त्यांच्या यशामागचं रहस्य एकच होतं – अडथळ्यांना न जुमानता आपल्या ध्येयावर ठाम राहणं.
माझं स्वतःचं जीवनही त्याला अपवाद नाही. आज जिथं मी उभा आहे, तिथं पोहोचण्यासाठी मला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. कधी मन खचलं, कधी रडल्याशिवाय राहवलं नाही. पण अशा वेळी माझ्या ध्येयानं मला पुन्हा उभं केलं. ते नेहमी म्हणायचं, “तुझं स्वप्न तुझी वाट पाहतंय. त्याला साकार करण्यासाठी तू मागे फिरू शकत नाहीस.”
“अडथळे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात; ते आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात.”
संकटं कितीही मोठी असली तरी त्यांना संधी मानावं. संघर्षांना सामोरं जाताना आपली ताकद वाढत जाते, आणि शेवटी आपण आपलं ध्येय गाठतो.
शेवटी एवढंच म्हणेन, “ध्येय म्हणजेच आपला खरा मार्गदर्शक आहे. अडथळ्यांना भीक घालू नका; संघर्ष करा, प्रामाणिक राहा, आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत राहा.”
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा