जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा यशस्वी प्रवास: अ‍ॅड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन


जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा यशस्वी प्रवास: अ‍ॅड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन

एरंडोल या छोट्याशा गावात एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या अ‍ॅड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन यांचा जीवन प्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांचे प्रतीक आहे. त्यांच्या वडिलांनी सुखदेव चौधरी यांच्या ऑइल मिलवर हमाली करून कुटुंबाचा चरितार्थ चालवला, तर आई कमलबाई यांनी घर सांभाळताना खूप कठीण प्रसंग झेलले. अशा परिस्थितीत वाढलेल्या ज्ञानेश्वर यांनी आपल्या शिक्षणासाठी आणि आयुष्य घडवण्यासाठी अपार कष्ट घेतले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण रा .ही. जाजू प्राथमिक विद्यालयात झाले, तर माध्यमिक शिक्षण रामनाथ तिलकचंद काबरे विद्यालयात पूर्ण झाले. त्यांच्या बालपणात गरिबी परिस्थितीने अक्षरशः कहर केला होता. घर काड्यांच्या भिंती आणि पत्र्याचे छप्पर असलेले, घरात विजेचा उजेडाचा पत्ताच नव्हता. रॉकेलच्या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या या मुलाला वह्या-पुस्तके खरेदीसाठी ही पैसे नव्हते. पण शिक्षण घेण्याची जिद्द त्यांच्या मनात घट्ट होती.

आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनेक कामे केली. प्रशांत ओपन थेटर जवळील एकवीरा हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम, चौधरी यांच्या चहाच्या दुकानात चहा विकणे, आणि श्रीकृष्ण ऑइल मिलवर शेंगदाण्यांच्या घाण्यावर काम करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी इंग्रजी विषयात पदवी मिळवली आणि पुढे जळगावच्या एस.एस. मन्यार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.

कायद्याचे शिक्षण घेत असताना ते बडगुजर होस्टेल मध्ये राहत होते. तिथे खूप कमी शुल्क आकारले जात होते, पण तरी ही ते स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करत असत. परिस्थिती किती ही कठीण असली तरी त्यांनी कधीच हार मानली नाही आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे चालत राहिले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दादासाहेब अ‍ॅड. अरुण पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीची सुरुवात केली. 2008 मध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठा यांच्या बळावर त्यांनी फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांमध्ये आपले नाव कमावले. आज एरंडोल मधील यशस्वी वकील म्हणून त्यांची ओळख आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन त्यांनी आपल्या जीवनाला स्थैर्य दिले. त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे आशीर्वाद, मोठ्या भावाने ओव्हरटाइम करून दिलेली मदत, आणि त्यांच्या पत्नी नमिता यांचे सहकार्य आहे. आज ते स्वतःच्या घरात आनंदाने राहतात. टाटा नेक्सन ही फाईव्ह स्टार कार हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यांच्या तीन मुली—जानवी, निशिका आणि लहानगी कुलश्री—यांच्या सोबत त्यांचा संसार आनंदाने फुललेला आहे.

अ‍ॅड. ज्ञानेश्वर महाजन यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. गरिबीवर मात करून शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे जीवन घडवणाऱ्या व्यक्तींसाठी ते एक आदर्श ठरले आहेत. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर कोणत्या ही अडचणींवर मात करता येते, हे त्यांनी आपल्या आयुष्याने दाखवून दिले आहे.

त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मेहनतीचा प्रवास आजही अनेकांना प्रेरणा देतो. संघर्षाने फुललेली ही कहाणी प्रत्येकाला यशस्वी जीवनाचा मंत्र देते—कधीही हार मानू नका, कारण यश नेहमी संघर्षाच्या पलीकडे असते!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !