"स्वप्नांची मुशाफिरी : आईच्या मातीची परतफेड"
"स्वप्नांची मुशाफिरी : आईच्या मातीची परतफेड"
काही माणसं संघर्षाशी जुळवून घेत नाहीत, तर त्याच्यावर मात करून आपलं नशिब स्वतः घडवतात. गरिबीच्या सावलीत वाढलेला मुलगा, जो रात्री उपाशीपोटी झोपायचा, त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर अब्जाधीश उद्योजक होण्याचा प्रवास केला. हा प्रवास अशोक खाडे यांचा आहे—एका सामान्य मजुराच्या घरात जन्मलेल्या मुलाचा, ज्याने आपल्या जिद्दीच्या बळावर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की मेहनतीला पर्याय नाही.
अशोक खाडे यांचं बालपण सांगली जिल्ह्यातील पेड गावात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेलं. वडील चर्मकार होते, आई आणि बहीण शेतमजुरी करायच्या. घरात दोन वेळचं अन्न मिळवणं ही कठीण होतं. शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीमुळे अनेकदा उपाशी झोपण्याची वेळ आली. पण वडिलांचे शब्द त्यांच्या मनात कायम घर करून होते—"गरिबी ही जन्माला येताना मिळते, पण ती घेऊन मरणं ही आपल्या हातात असतं."
याच विचारांनी प्रेरित होऊन अशोक खाडे यांनी शिक्षणाची कास धरली. शाळा सोडावी लागू नये म्हणून त्यांनी तासगावच्या बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतलं. तिथे ही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. कधी उपासमार झाली, कधी मित्रांनी मदतीचा हात पुढे केला, पण कधी ही परिस्थिती समोर हार मानली नाही. मात्र, परिस्थितीने त्यांना इतकं मजबूर केलं की शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठावी लागली.
मुंबईत माझगाव डॉकमध्ये हॅंडीमन म्हणून पहिलं काम सुरू झालं. पहिला पगार फक्त ९० रुपये होता. पण त्यांचं मन मोठं स्वप्न बघत होतं. हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे शिप डिझायनिंगचं प्रशिक्षण मिळालं आणि काही वर्षांतच बढती मिळाली. पगार ३०० रुपये झाला, पण समाधान नव्हतं. मनात अजूनही शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती.
अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी गुणवत्ता नियंत्रण विभागात काम सुरू केलं. याच नोकरी दरम्यान त्यांना जर्मनीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. तिथे आधुनिक तंत्रज्ञान पाहिल्यावर त्यांच्या मनात एक नवा संकल्प जन्माला आला—आपल्याही देशात असं काही तरी मोठं निर्माण करायचं.
मुंबईत परतल्या नंतर त्यांनी आणि त्यांच्या भावाने मिळून "दास ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड" ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला अडथळे आले, पण मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केलं. आज त्यांच्या कंपनीत हजारो कर्मचारी आहेत आणि वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे.
पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर ही त्यांनी आपल्या मुळांना विसरलं नाही. ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून राबायची, तेच शेत विकत घेऊन त्यांनी आईच्या हाती मालकीची कागदपत्रं दिली. हा क्षण त्यांच्या जीवनातील सर्वात भावनिक आणि अभिमानास्पद होता.
अशोक खाडे यांचा हा प्रवास प्रत्येक तरुणाला शिकवणारा आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचता येतं. गरिबीशी झगडत, कधीही हार न मानता स्वप्न पूर्ण करणाऱ्या या महापुरुषाला समाजाचा मानाचा मुजरा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा