संघर्षातून उभा राहिलेला यशाचा दीपस्तंभ – विक्रम पै


संघर्षातून उभा राहिलेला यशाचा दीपस्तंभ – विक्रम पै

जीवनात यशस्वी होण्यासाठी चिकाटी, आत्मविश्वास आणि जिद्द या गुणांची आवश्यकता असते. अपयश हा शेवट नसतो, तर तो केवळ पुढच्या मोठ्या यशाची नांदी असते. विक्रम पै हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत. सहा वर्षांत पाच व्यवसाय बुडाले, दोन कोटींचं नुकसान सहन करावं लागलं, शारीरिक त्रास सोसावा लागला, मित्रांनी साथ सोडली, समाजाने टोमणे मारले… पण तरीही त्याने हार मानली नाही. आणि आज? तो दररोज दीड लाख रुपये कमवणारा यशस्वी उद्योजक आहे.

विक्रमने मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली, पण नियतीनं त्याला सतत नवीन अडथळ्यांच्या चक्रव्यूहात टाकलं. एकामागून एक पाच व्यवसाय अपयशी ठरले. आर्थिक संकट इतकं गहिरं झालं की त्याच्याकडे फक्त चार हजार रुपये शिल्लक होते. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. लोकांनी हसू केले, “हा एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय!” असं म्हणून टोमणे मारले.

या कठीण काळात शरीरानेही त्याला साथ सोडली. अपार तणाव आणि सततच्या संघर्षामुळे त्याला लकवा झाला. एका बाजूला प्रचंड आर्थिक संकट, तर दुसऱ्या बाजूला शारीरिक दुर्बलता… कुणाचाही आत्मविश्वास डळमळीत झाला असता. पण विक्रम अशा परिस्थितीतही खचला नाही. त्याच्यातील जिद्द अधिकच प्रबळ झाली.

संघर्षाच्या या सागरातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःला एका नवीन संकल्पनेत गुंतवलं. त्यातून जन्म झाला ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसायांना ग्राहकांच्या मदतीने नवीन ग्राहक मिळवता येतात. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना देतात आणि त्या बदल्यात त्यांना कमिशन मिळतं. या कल्पनेला व्यवसाय जगतात मोठी दाद मिळाली.

निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २४०० कंपन्यांमधून त्याच्या स्टार्टअपची निवड झाली. हीच होती यशाची खरी सुरुवात. सुरुवातीला पहिल्या एका लाख रुपयांसाठी चार महिने वाट पाहावी लागली, पण एकदा गती मिळाल्यावर यशाचा प्रवाह थांबला नाही. आज ReferRush दररोज दीड लाख रुपये कमावतो!

विक्रमचं स्वप्न आहे की भविष्यात प्रत्येक ई-कॉमर्स कंपनी त्याच्या प्लॅटफॉर्मचा वापर करेल. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासावरून पाहता, ते शक्य होणारच!

त्याची कहाणी हे केवळ यशाचं उदाहरण नाही, तर जिद्द, संघर्ष आणि न डगमगणाऱ्या आत्मविश्वासाचा आदर्श आहे. तो स्वतः म्हणतो, "जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता!"

त्याच्या पहिल्या पाच वर्षांत अपयशच अपयश होतं. पण त्याने शिकणं सोडलं नाही. म्हणूनच तो आज यशस्वी आहे.

विक्रम पैचं आयुष्य शिकवून जातं की संघर्षाशिवाय यश नाही. अपयश कायमचं नसतं, पण प्रयत्न थांबले तर यश दूर जातं. तरुण उद्योजकांनी विक्रमकडून शिकायला हवं – जिद्द कधीच सोडायची नाही. कारण यशाचं खरं रहस्य हेच आहे – "एक पाऊल मागे, पण पुढे मोठी झेप घ्यायला!"


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !