आई-वडिलांचे प्रेम कधीही विसरू नका
आई-वडील ही केवळ नाती नाहीत, तर त्याग, प्रेम, ममता आणि निःस्वार्थ कष्टांची जिवंत मूर्ती आहेत. आपल्या जन्मापासून आजपर्यंत त्यांनी आपल्यासाठी काय केलं नाही? पहिल्या रडण्याला हसू दिलं, पहिल्या पावलांना आधार दिला, प्रत्येक यशात आनंद साजरा केला आणि अपयशात धीर दिला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या सुखासाठी झिजवलं, आपल्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. पण आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासाठी किती वेळ देतो? त्यांचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करतो का?
आई ही केवळ एक व्यक्ती नसते, ती एक भावना असते. तिच्या मायेचा ओलावा जीवनभर पुरतो. आपण लहान असताना कितीही रडलो, हट्ट केला, त्रास दिला तरी तिने आपल्याला कधीही दूर लोटलं नाही. उलट आपले डोळे पुसले, मिठीत घेतलं. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या गरजा दडपल्या. आपण झोपलो की ती आपल्या कपाळावर मायेची थाप देऊन झोपायची. आपण शाळेत जाताना स्वतः भुकेली राहून आपल्या हातात डब्बा द्यायची. आपण रागावले, चिडलो तरीही तिने आपल्यावरचं प्रेम कधीही कमी होऊ दिलं नाही.
आज आपण मोठे झालो, आपले वेगळे विश्व तयार केले, पण तिच्या जीवनात मात्र आपलीच जागा आहे. ती आजही आपल्याला पहिल्यासारखंच जपते, आपल्याला आठवून डोळे पुसते. तिच्या मऊ हातांनी आपले केस कुरवाळणारी आई, तिच्या हलक्या आवाजात लाडिक बोलणारी आई, आज आपण तिला वेळ देतो का? ती आपल्याकडे प्रेमाने पाहते, बोलायचा प्रयत्न करते, पण आपल्याला फारशी पर्वा नसते. आपण फोन घेत नाही, तिला उत्तर देत नाही. पण लक्षात ठेवा, ज्या हातांनी आपल्याला मोठं केलं, ते जर आपल्यासाठी थरथर कापू लागले, तर त्याच्यापेक्षा मोठं पाप कोणतं?
वडील म्हणजे आधार. ते आपल्या भावनांना फारसे व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत आपल्यावरचं प्रेम असतं. ते कधीही आपल्या सुखासाठी थांबत नाहीत. उन्हातान्हात कष्ट करून, आपल्या भविष्यासाठी धडपड करून, त्यांनी आपल्याला मोठं केलं. आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या.
लहानपणी आपल्या पहिल्या सायकलसाठी हट्ट धरला होता ना? ती सायकल कुठून आणायची याचा विचार करत ते कित्येक रात्री झोपलेही नसतील. नवीन कपडे, चांगली शाळा, छानसं शिक्षण, हे सगळं मिळावं म्हणून त्यांनी स्वतःला झिजवलं. पण आज आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासाठी वेळ आहे का?
आज ते म्हातारे झाले, कदाचित थकलेही असतील. पण आपल्यासाठी त्यांची माया तशीच आहे. आपण मात्र त्यांचं प्रेम विसरतो. त्यांचं अस्तित्व विसरतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडील मागे पडले आहेत. मुलं मोठी झाली, लग्न झालं, नोकरी-व्यवसायात स्थिर झाली, आणि मग आई-वडिलांची किंमत कमी झाली. कित्येक जण आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात, त्यांचे फोन उचलत नाहीत, महिनोन्महिने त्यांना भेटत नाहीत. त्यांच्या भावनांची किंमतच उरलेली नाही.
जेव्हा ती आई मूक अश्रूंनी तुमची वाट पाहत असते, तेव्हा त्या डोळ्यांमध्ये तुमच्या आठवणी असतात. जेव्हा तो बाबा रोज दाराकडे पाहत असतो, तेव्हा त्या नजरेत तुमची ओढ असते. एकदा वृद्धाश्रमात जाऊन बघा, तिथल्या प्रत्येक डोळ्यात एकच प्रश्न असतो – "माझी लेकरं मला घ्यायला कधी येतील?"
तो दिवस येतो, जेव्हा ते दोघं कायमचे डोळे मिटतात. मग मात्र तुम्ही त्यांना पुन्हा भेटू शकत नाही. त्यांचे शब्द पुन्हा ऐकायला मिळावेत यासाठी तुम्ही जीव टाकाल. पण वेळ निघून गेलेली असेल.
आई-वडिलांसाठी मोठं काही करायची गरज नाही. त्यांना महागड्या भेटवस्तू नकोत. त्यांना फक्त तुमचं प्रेम हवंय, तुमचा सहवास हवा आहे. त्यांना बसून तुमच्याशी बोलायचंय, तुमच्या आठवणींमध्ये हरवायचंय.
तुम्ही त्यांना पोटभर जेवायला घालू शकत नसाल, तरी त्यांच्यासोबत बसून दोन घास खा. त्यांना मोठी भेट देऊ शकत नसाल, तरी त्यांना प्रेमाने मिठी मारा. वेळ काढा, फोन करा, त्यांच्या गोष्टी ऐका. त्यांचा हात हातात घ्या. त्यांना सांगा – "आई-बाबा, तुम्ही माझ्यासाठी झिजलात, आता तुमच्या सुखासाठी मी झिजेन!"
आज तुमच्याकडे जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांनीच दिलंय. त्यांच्या कष्टांनी तुम्ही घडला आहात. त्यामुळे त्यांनी झिजवलेलं आयुष्य, त्यांना परत द्या. त्यांना विसरू नका. त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांच्यासोबत बोला.
कारण… आई-वडील पुन्हा मिळत नाहीत!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा