स्वतःवर विश्वास : यशाची गुरुकिल्ली


व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग ४१

स्वतःवर विश्वास : यशाची गुरुकिल्ली

माणसाच्या जीवनात विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आधार असतो. मात्र, हा विश्वास इतरांवर ठेवण्यापेक्षा स्वतःवर ठेवला, तर कोणती ही गोष्ट अशक्य वाटत नाही. जिथे बाकीचे हार मानतात, तिथे आत्मविश्वास असलेला माणूस जिंकतो. कारण तो स्वतःवर दृढ विश्वास ठेवून पुढे जाण्याची जिद्द बाळगतो.

स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या क्षमतांवर, प्रयत्नांवर आणि मेहनतीवर निष्ठा ठेवणे होय. बाहेरचे जग काही ही म्हणो, पण मनात ठाम विश्वास असेल, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. यशस्वी आणि सामान्य लोकांमधला सर्वात मोठा फरक हाच असतो—स्वतःवर असलेला आत्मविश्वास!

यशाच्या वाटेवर अनेक अडथळे येतात—अपयश, समाजाची टीका, परिस्थितीचा संघर्ष—परंतु जो स्वतःवर विश्वास ठेवतो, तो कधी ही थांबत नाही. कधी कधी तो अपयशाच्या छायेत पडतो, पण पुन्हा उभा राहतो. त्याला हे ठाऊक असते की, "मी प्रयत्न करत आहे, म्हणजे मी जिंकणारच!"

स्वतःवर विश्वास असेल, तर माणूस कोणती ही कठीण गोष्ट साध्य करू शकतो. थॉमस एडिसन यांना हजारो वेळा अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. स्वतःवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी विजेचा दिवा शोधून काढला. अब्राहम लिंकन अनेकदा निवडणुका हरले, तरीही आत्मविश्वास कायम ठेवला आणि अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आपल्याही आयुष्यात अशा अनेक परीक्षा येतील, पण जर आपण आत्मविश्वास टिकवून ठेवलात, तर कोणत्या ही संकटावर मात करून यश संपादन करू शकतो.

यश मिळवायचे असेल, तर स्वतःवर अढळ विश्वास असावा. म्हणूनच, स्वतःला रोज सांगावे—
"माझी मेहनत कधीही वाया जाणार नाही."
"मी जे ठरवलंय, ते करूनच दाखवेन!"
"माझ्या क्षमतांवर मला पूर्ण विश्वास आहे."
"मी हरलो तरी प्रयत्न सोडणार नाही, कारण यश हे माझेच आहे!"

जोपर्यंत हा विश्वास मनात आहे, तोपर्यंत यश नक्कीच भेटेल. कारण यश हे मेहनतीचे फळ असते, पण त्या मेहनतीला बळ देणारा आत्मविश्वास हा अंतःकरणात असतो. म्हणूनच, कोणत्या ही परिस्थितीत हार मानू नका. संकटांशी लढा, चुका सुधारत राहा आणि एक दिवस तुमच्या जिद्दीच्या प्रकाशात यश तुमच्या समोर उभे असेल.

"स्वतःवर विश्वास ठेवा... कारण यश तुमचंच आहे!"

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !