ध्येयाशी एकनिष्ठ… यशाच्या शिखराकडे!

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग ४४
  
ध्येयाशी एकनिष्ठ… यशाच्या शिखराकडे!

जीवन म्हणजे एक संघर्षमय प्रवास. या प्रवासात अनेक वळणं असतात, काही सोपी, काही अवघड, काही आनंददायक तर काही वेदनादायक. पण ज्या क्षणी माणूस स्वतःच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहतो, त्या क्षणापासूनच त्याचा यशाकडे प्रवास सुरू होतो. माझं यश, माझं ध्येय – आणि त्यासाठी मी सदैव तयार आहे!

लहान असताना स्वप्नं पाहणं सहज होतं, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वास असावा लागतो. माझं बालपण साधं होतं, पण विचार मोठे होते. खूप वेळा स्वप्नं बघितली, पण ती प्रत्यक्षात आणण्याचं धैर्य लागतं. मीही एक दिवस ठरवलं – “माझ्या स्वप्नांचा पाठलाग मीच करायचा, कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही!”

ध्येयाच्या मार्गावर चालताना कितीदा तरी अडथळे आले, संकटं आली, कधी कधी वाटलं की सर्व काही संपलंय. पण मग आठवलं, यशस्वी लोक कधीही परिस्थिती समोर झुकत नाहीत. त्यांनी संघर्षाला मिठी मारली, अपयशाकडून धडे घेतले आणि यशाकडे वाटचाल केली. मी ही ठरवलं – “मी अपयशाला शरण जाणार नाही, कारण माझा विश्वास माझ्या कष्टांवर आहे!”

रात्रंदिवस मेहनत घेतली, वेदना सोसल्या, झोपेचे कित्येक तास गमावले, पण त्या प्रत्येक क्षणानं मला अधिक बळकट केलं. माझ्या स्वप्नांची वाट सोपी नव्हती, पण मी ठरवलं होतं – "मी थांबणार नाही!"

खरं तर, यश म्हणजे केवळ मोठ्या गोष्टी साध्य करणं नव्हे. यश म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं. यश म्हणजे संघर्षाला सामोरं जाणं, ध्येयाच्या दिशेने अविरत वाटचाल करणं. यश म्हणजे समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी, लोकांसाठी प्रेरणा होण्याची ताकद!

आज मी जे काही मिळवलं आहे, ते केवळ माझ्या मेहनतीमुळे, माझ्या जिद्दीमुळे! पण हा प्रवास अजून संपलेला नाही. माझ्या पुढे अजून ही मोठी स्वप्नं आहेत, अजून यशाच्या अनेक शिखरांवर पोहोचायचं आहे. माझा आत्मविश्वास मला सांगतो की मी थांबणार नाही, झुकणार नाही, हरणार नाही!

माझं यश, माझं ध्येय – आणि मी त्यासाठी सदैव तयार आहे! कारण…

ध्येय गाठायचं असेल, तर संघर्षाला मिठी मारावी लागते. परिश्रमाची कास धरावी लागते. मनात विश्वास असेल, तर कोणतं ही स्वप्न अशक्य नसतं!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !