अपयशाच्या वादळातून यशाच्या शिखराकडे!


व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग ४३

अपयशाच्या वादळातून यशाच्या शिखराकडे!


जीवन म्हणजे संघर्षांचा अखंड प्रवाह. प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला यश येतेच, पण त्या आधी अपयशाच्या कठीण वाटे वरून जावे लागते. काही जण अपयशाने खचून जातात, तर काही जण त्यालाच प्रेरणास्थान मानून पुढे जातात. मात्र, मी ठरवले आहे—मी यशस्वी होणारच, कारण अपयश मला घाबरवत नाही!

अपयश म्हणजे थांबणे नव्हे, तर नव्या यशाच्या प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा एखादी योजना अयशस्वी होते, तेव्हा ती पूर्णतः संपते असे नाही; ती पुन्हा नव्या जोमाने आणि अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची संधी असते. जीवनात प्रत्येक टप्प्यावर अडथळे येतात, पण ते आपली क्षमता आजमावण्यासाठीच असतात.

लहान मूल जेव्हा पहिल्यांदा चालायला शिकते, तेव्हा कित्येक वेळा पडते. मात्र, तरी ही ते पुन्हा उठून चालू लागते. त्याला पडण्याची भीती वाटत नाही, कारण त्याचा विश्वास असतो की तो चालायला शिकेल. मग आम्ही मोठ्यांनी ही तसेच का करू नये? जेव्हा एखादी गोष्ट मनापासून साध्य करायची असते, तेव्हा येणाऱ्या अपयशाला पराभव मानायचे नसते, तर ती आपल्या ध्येयाच्या दिशेने टाकलेली एक पायरी समजायची असते.

महान व्यक्ती अपयशाला कधी ही शाप मानत नाहीत, तर त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. थॉमस एडिसन यांनी विजेचा बल्ब तयार करताना हजारो वेळा प्रयोग केले. प्रत्येक अपयशा नंतर त्यांना नवा धडा मिळत गेला. अखेरीस, ते यशस्वी झाले आणि आज त्यांच्या त्या शोधामुळे संपूर्ण जग उजळले आहे. अमेरिकेचे महान अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना देखील अनेक अपयशांचा सामना करावा लागला. अनेक निवडणुकांत त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अपयशातून शिकले आणि शेवटी इतिहास घडवला.

खरा यशस्वी तोच, जो अडथळ्यांना न घाबरता आपल्या स्वप्नांसाठी अथक परिश्रम घेतो. जीवन हा कुठला ही शॉर्टकट नसलेला मार्ग आहे. येथे प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. जे संघर्षाला घाबरतात, ते हरतात; पण जे अपयशावर मात करून नव्या जोमाने पुढे जातात, तेच यशाच्या शिखरावर पोहोचतात.

मी किती ही वेळा अपयशी ठरलो, तरी मी प्रयत्न करत राहीन. कधी कधी असे वाटते की आपण किती ही मेहनत केली, तरी अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. मात्र, तेव्हा हे लक्षात ठेवायला हवे की सर्व गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडत नाहीत, पण त्या योग्य वेळी होतात. गुलाबाचे फूल लगेच फुलत नाही, त्याला वेळीच पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो. त्याच प्रमाणे, मानवी जीवनात ही योग्य वेळी योग्य गोष्ट घडते. त्यामुळेच, मी माझ्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करत राहणार, अपयशाने घाबरणार नाही आणि एक दिवस यशाला गवसणी घालणार.

मी अपयशाचा स्वीकार करतो, कारण ते मला शिकवते. मी अपयशाकडून शिकून, स्वतःला सुधारत राहीन आणि अधिक मोठ्या जिद्दीने माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करीन. जो पर्यंत मी प्रयत्न सोडत नाही, तो पर्यंत मी कधीही हरू शकत नाही.

"अपयशाला हरवण्याची जिद्द ठेवा, यश तुमच्या पावलांशी नतमस्तक होईल!"

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !