आई – एक अढळ सावली


आई – एक अढळ सावली

आई... या दोन अक्षरांमध्ये अख्खं विश्व सामावलेलं आहे. प्रेम, त्याग, माया, करुणा आणि निस्वार्थपणा यांचं जिवंत प्रतीक म्हणजे आई. तिच्या मायेच्या छायेखालीच लेकरं मोठी होतात, सुख-दुःखाला सामोरी जातात आणि आयुष्याची लढाई लढण्याची ताकद मिळवतात.

लहान असताना चुकलं की आईचा ओरडा सहन करायला नकोसा वाटायचा, पण तीच आई डोळ्यांतून पाणी काढत आपल्या पोरासाठी देवाला साकडं घालत असे. भुकेल्या पोटी राहूनसुद्धा तिनं आपल्या लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही. स्वतःच्या स्वप्नांची राख करून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंख देणारी आई हीच असते.

आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे. अंगावर उघड्या अंगाने पांघरूण घालणारी, चुकलं तरी समजून घेणारी, वाईट काळात भक्कम आधार देणारी आणि सुखात आपल्या पोरांपेक्षा अधिक आनंदी होणारी – अशी आई प्रत्येकाच्या आयुष्यात असते.

वय वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या, आणि आपण मोठे झालो. पण ज्या हातांनी आपल्याला उभं केलं, त्या हातांना धरून चालण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे! तीच आई, जी कधी आपल्या प्रत्येक इच्छेसाठी झुरली, तीच आज आपल्या एका फोनसाठी डोळे लावून बसते.

आईच्या या अथांग प्रेमाला कधीच तोड नाही. तिनं दिलेल्या मायेचं ऋण फेडणं अशक्य असतं, पण तिच्यासोबत थोडा वेळ घालवणं, तिच्या सुख-दुःखात सहभागी होणं, हे मात्र आपण नक्कीच करू शकतो. कारण शेवटी आई ही फक्त आई असते – देवाची सर्वात सुंदर निर्मिती!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !