आई-वडिलांशिवाय आयुष्य: वाऱ्याच्या भरवशावर उडणारे पान
आई-वडिलांशिवाय आयुष्य: वाऱ्याच्या भरवशावर उडणारे पान
आयुष्य म्हणजे सुख-दुःख, चढ-उतार, हसू आणि आसवांचे एक जुळवाजुळी असलेले नातं. पण हे सगळं अनुभवताना कोणीतरी आपल्या पाठीशी असावं लागतं. जेव्हा एखाद्या झाडाला मजबूत मुळे असतात, तेव्हा कितीही वादळे आली, तरी ते झाड उन्मळून पडत नाही. पण जर मुळेच नसतील, तर ते झाड कधीही कोसळू शकतं. हाच नियम आपल्या जीवनालाही लागू होतो. आई-वडिलांशिवाय आयुष्य म्हणजे वाऱ्यावर उडणाऱ्या पानासारखं – कुठं वाहून जाईल, याचा काही नेम नाही.
आई-वडील म्हणजे आपल्या आयुष्याची खरी संपत्ती. पैसा, प्रतिष्ठा, यश, सगळं कमावता येतं, पण आई-वडिलांचं प्रेम, त्यांचा सहवास, त्यांचं अस्तित्व पुन्हा मिळवता येत नाही. त्यांच्या प्रेमाचे ओलावेदार हात जेव्हा आपल्या डोक्यावर असतात, तेव्हा जगातील कोणताही वादळ आपल्या आयुष्याला हलवू शकत नाही. पण एकदा का ते हात सुटले, की माणूस कितीही मोठा असला, तरी तो आतून कोसळतो.
लहान असताना जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकायचं धाडस करतो, तेव्हा आई आपल्या दोन्ही हातांनी आपल्याला सावरत असते. पडलो, तरी ती तिथेच असते, आपल्याला उचलायला. जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातो, तेव्हा वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू असतात. पण एक दिवस असाही येतो, जेव्हा आपणच त्यांच्या आठवणींना कवटाळून बसतो. त्यांच्याशिवाय आयुष्य किती पोकळ आहे, हे त्या वेळी कळतं.
आईवडिलांशिवाय माणूस जगतो, चालतो, बोलतो, हसतो, पण आतून तो तुटलेला असतो. आयुष्याला दिशा दाखवणारे, आपल्या प्रत्येक यशात मनापासून आनंदी होणारे, आपल्या प्रत्येक अपयशात धीर देणारे हातच जेव्हा सोबत नसतात, तेव्हा माणूस रिकामा वाटतो. घर असतं, पण त्याला घरपण नसतं. पैसा असतो, पण तो खर्च करण्यासाठी मन नसतं. स्वप्न असतात, पण त्यांना साकार करण्याची उर्मी नसते. कारण आई-वडील नसताना मिळालेलं यश, कोणाला दाखवायचं? कोणाच्या डोळ्यांत ते पाहायचं?
ज्यांच्याकडे आई-वडील असतात, त्यांना कधी कधी त्यांची किंमत जाणवत नाही. पण जेव्हा ते नसतात, तेव्हा जाणवतं की त्यांच्या सहवासासारखं दुसरं काहीच नाही. रोजच्या धकाधकीत आपण त्यांच्यासोबत हसणं, बोलणं विसरतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही कमावलेली संपत्ती पुन्हा मिळू शकते, हरवलेली संधी पुन्हा येऊ शकते, पण हरवलेले आई-वडील पुन्हा येणार नाहीत. म्हणून जेव्हा संधी आहे, तेव्हा त्यांना प्रेम द्या, त्यांचा सन्मान करा, त्यांच्या सोबत राहण्याचा प्रत्येक क्षण जगून घ्या.
आई-वडिलांशिवाय आयुष्य म्हणजे एक अशी दुनिया, जिथे सगळं असतं, पण त्यात जिवंतपणा नसतो. ते नसताना माणूस कितीही मोठा झाला, तरीही त्याच्या आयुष्याला खरा आधार नसतो. तो वाऱ्यावर उडणाऱ्या पानासारखा असतो – अनिश्चित, अस्थिर, कुठे जाईल याचा ठावठिकाणा नाही. म्हणून त्यांच्या अस्तित्वाची किंमत जिवंतपणीच ओळखा, कारण त्यांचे हात डोक्यावर असणं, हाच खरा आशीर्वाद आहे.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा