"स्वप्न आणि मुळे"
"स्वप्न आणि मुळे"
रात्री उशिरा झोपताना, डोळे मिटल्यावर दिसणारी स्वप्नं खूप मोठी असतात… भविष्यात आपलं नाव असावं, मोठं यश मिळवावं, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं—हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण या स्वप्नांच्या मागे धावताना आपण कधी विचार करतो का की ही स्वप्नं पाहण्याची ताकदच आपल्याला कोणी दिली?
लहानपणी जेव्हा आपले पाय लटपटत होते, तेव्हा कोणीतरी हात धरून आपल्याला चालायला शिकवलं… जेव्हा पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकलं, तेव्हा कोणीतरी आपल्या पाठीवर मायेचा हात ठेवला… जेव्हा अभ्यास नकोसा वाटला, तेव्हा कोणीतरी प्रेमाने समजावलं… आणि जेव्हा जगाशी लढण्याची वेळ आली, तेव्हा कोणीतरी मनापासून पाठिंबा दिला. तो 'कोणीतरी' म्हणजे आपले आई-वडील!
बालपणात जेव्हा आपण पहिल्यांदा धडपडलो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्यांनी आपल्याला उचललं, धीर दिला, पुन्हा उभं राहायला शिकवलं. आज आपण मोठं होण्याच्या धडपडीत ते अश्रू पाहण्याचंही आपल्याला भान राहिलंय का?
आईच्या डोळ्यांमध्ये डोकावून पाहिलंत का?
तिथे तुमच्या आठवणींचा खजिना सापडेल.
वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलंत का?
तिथे तुमच्या भविष्याची चिंता दिसेल.
आईच्या हातून एक घासही न घेताच आपण महागड्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत डिनर करतो… वडिलांनी स्वतःसाठी एक शर्ट घेतला नाही, पण आपण ब्रँडेड कपड्यांमध्ये मिरवतो… आई-वडील दिवसभर आपल्या वाटेकडे डोळे लावून बसतात, पण आपल्याला त्यांच्यासाठी वेळच नसतो. हे योग्य आहे का?
यश मिळवण्याची घाई इतकी झाली आहे की आपल्या जन्मदात्यांना आपण मागे सोडतोय. त्यांना वाटतं, "आपलं मूल मोठं झालंय, आता त्याला आपल्या मायेची गरज नाही." पण ही चूक आहे. कारण तुमच्या यशाच्या शिखरावर तुम्ही कितीही पोहोचलात तरी तुमचं पायथ्याशी असलेलं 'घर' आई-वडिलांशिवाय अपूर्ण आहे.
आज तुम्ही मेहनत करून स्वप्न पूर्ण करत आहात, उद्या मोठे व्हाल, पण या धडपडीत तुम्ही जर आई-वडिलांना हरवलंत, तर त्या यशाला काय अर्थ?
स्वप्नं उंच असू द्यात, पण मुळे जमिनीत घट्ट असू द्या...
आकाशाला गवसणी घालायला निघालात तरी आई-वडिलांच्या पायाखालची माती कधीही विसरू नका.
आई-वडिलांचं प्रेम विकत मिळत नाही, त्यासाठी त्यांच्यासोबत असावं लागतं... त्यांना सोडून मिळालेलं यश ही एकट्याची संपत्ती असते, पण त्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं यश ही आयुष्यभराची शिदोरी असते.
तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलात, पण जर तेच आई-वडील तुमच्या सोबत नसतील, तर ते यश कुणासाठी? त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच नाहीसं झालं, तर त्या यशाचं मोल तरी काय?
आजच्या धकाधकीच्या जगात आई-वडिलांसाठी वेळ काढणं ही 'जवाबदारी' वाटू लागली आहे. पण लक्षात ठेवा, आज ते तुमच्यासाठी वेळ मागत आहेत, उद्या तुम्ही त्यांच्या अस्तित्वासाठी रडाल, तेव्हा ते असतीलच असं नाही…
त्यामुळे उशीर होण्याआधी जा… त्यांच्या हातांना स्पर्श करा… त्यांच्या कुशीत पुन्हा एकदा लहान व्हा… त्यांना कळू द्या की, "हो, मी मोठा झालोय, पण तुमच्यासाठी आजही लहान आहे…"
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा