इंद्रजीत दिवाकर महाजन – शून्यातून विश्व निर्माण करणारा एक योद्धा
इंद्रजीत दिवाकर महाजन – शून्यातून विश्व निर्माण करणारा एक योद्धा
गरिबी ही खऱ्या लढवय्यांची खरी परीक्षा असते. काही जण परिस्थितीसमोर हार मानतात, तर काही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर परिस्थितीलाच झुकवतात. इंद्रजीत दिवाकर महाजन हे त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कठीण जीवनप्रवासात एक क्षणही मागे वळून पाहिले नाही, तर परिस्थितीच्या प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जात शून्यातून विश्व निर्माण केले.
एरंडोल येथील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांचे बालपण सुखासीन नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती, पण आई-वडिलांची सावली होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. इयत्ता आठवीत असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्यांच्या आयुष्याला एक कठीण कलाटणी मिळाली. घरातील कर्ता पुरुष हरवल्याने संपूर्ण जबाबदारी आईवर आली. डोळ्यांत अश्रू असले तरी हात थांबले नाहीत. आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा पुढे न्यायचा निर्धार केला. पण एका स्त्रीच्या एकट्या हातांनी मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा किती दिवस चालवणार? तेव्हा अवघ्या तेराव्या वर्षी इंद्रजीत यांनी कोवळ्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे उचलले.
गरिबीला हरवायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी लहान वयातच समजून घेतले. कष्टांमुळे त्यांचे मनोधैर्य कधीच कमी झाले नाही. दिवसा शाळा, संध्याकाळी STD बूथवर काम आणि उरलेल्या वेळात अभ्यास, हा त्यांचा दिनक्रम ठरला. एका हाताने चरितार्थ चालवायचा आणि दुसऱ्या हाताने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवायची, ही जिद्द त्यांनी बाळगली. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. जळगावला जाऊन पुढील शिक्षण घेतले आणि आपल्या मेहनतीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
अनेक संघर्षांना तोंड देत त्यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, जळगाव शाखेत "लिगल मॅनेजर" म्हणून जबाबदारीचे पद मिळवले. कधी नोकरीच्या शोधात जळगाव गाठणारे इंद्रजीत, आज त्याच जळगावमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी झाले. मात्र एवढ्या यशानंतरही त्यांच्यातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा तसाच आहे. लाचलुचपत आणि फसवणूक हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांच्या सचोटीमुळेच सहकाऱ्यांमध्ये आणि समाजात त्यांच्याविषयी अपार आदर आहे.
त्यांच्या यशामागे त्यांच्या आईच्या अथक परिश्रमांचे मोठे योगदान आहे. घर चालवण्यासाठी तिने दिवस-रात्र शिवणकाम केले. स्वतःच्या इच्छांना दुजोरा न देता फक्त मुलांचे भविष्य घडवण्यासाठी झगडली. आणि आज इंद्रजीत यांनी तिच्या प्रत्येक कष्टाला यशाचे सोनं लावलं आहे.
इंद्रजीत महाजन यांची कहाणी केवळ एका यशस्वी माणसाची नाही, तर ती आहे संघर्ष, जिद्द आणि मेहनतीने घडवलेल्या स्वप्नांची. आज ते तरुणांना सांगतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिकपणा यावर विश्वास ठेवा. कारण जे संघर्षाला घाबरत नाहीत, तेच आयुष्य जिंकतात.
त्यांच्या या अद्वितीय प्रवासाला मनःपूर्वक सलाम!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा