शांत अभ्यासू माणूस – ॲड. मोहनजी शुक्ला सर
शांत अभ्यासू माणूस – ॲड. मोहनजी शुक्ला सर
न्यायाच्या मंदिरात उभे असलेले एक शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय ॲड. मोहनजी शुक्ला सर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी काही लिहिणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वकिलीच्या क्षेत्रात संघर्ष, तणाव आणि स्पर्धा हे सहज दिसणारे पैलू असले तरी, या सगळ्यात शांतपणे, संयमाने आणि अपार ज्ञानसंपत्तीच्या बळावर मार्गक्रमण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहनजी शुक्ला सर.
त्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवते की त्यांच्या चेहऱ्यावर कुठला ही दिखावा नाही, शब्दांत कोणती ही आक्रमकता नाही, पण डोळ्यांत मात्र नितळ ज्ञान आणि आत्मविश्वास आहे. त्यांची खरी ताकद त्यांच्या अभ्यासात आणि सखोल विचारसरणीत आहे. वकिली व्यवसायात अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात, परंतु मोहनजी शुक्ला सर संयम कधीच सोडत नाहीत. कुणाला ही न दुखावता, परंतु ठामपणे न्यायाची बाजू मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.
आजच्या तरुण पिढीने जर कोणाचा आदर्श घ्यायचा असेल, तर तो नक्कीच मोहनजी शुक्ला सरांचा घ्यावा. संयम, साधेपणा आणि ज्ञानाचा महासागर ही त्यांची जमेची बाजू. त्यांना पाहिल्यावर वाटते की यशस्वी होण्यासाठी आक्रमक असण्याची आवश्यकता नाही, फक्त प्रचंड अभ्यास आणि चिकाटी असणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते आपल्या मुलाप्रमाणे शिकवतात. कठीण विषय असो किंवा गुंतागुंतीचा न्यायप्रश्न, मोहनजी शुक्ला सरांच्या एका सल्ल्याने मार्ग स्पष्ट होतो.
वकिली व्यवसाय म्हटला की आक्रमक आणि आढ्यताखोर स्वभाव ही ओळख डोळ्यासमोर येते. मात्र, मोहनजी शुक्ला सर त्याला अपवाद आहेत. त्यांच्या बोलण्यात नम्रता आहे, परंतु त्यांच्या न्यायनिष्ठ भूमिकेत ठामपणा आहे. ते कुणाला ही दुखावत नाहीत, पण सत्यासाठी झगडतात. त्यामुळेच त्यांची ओळख केवळ एक विधीतज्ञ म्हणून नाही, तर समाजातील न्यायासाठी लढणारे एक तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आहे.
मोहनजी शुक्ला सर हे केवळ एक उत्तम वकील नाहीत, तर ते एक उत्तम माणूस आहेत. त्यांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. ते पैशासाठी नव्हे, तर न्यायासाठी लढतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळाच आत्मीयतेचा सुगंध आहे. शांत माणसं खूप काही बोलत नाहीत, पण ती आपल्या कृतीतून मोठे धडे शिकवतात. त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा आणि समाजकार्याचा एक आनंदोत्सवच आहे.
मोहनजी शुक्ला सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ते नेहमी ताठ मानेने न्यायाचा मार्ग दाखवत राहोत, नव्या पिढीला शिकवत राहोत आणि समाजात सद्भावना निर्माण करत राहोत. अशा या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अनंत आनंद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा