"दहावी नापास… पण यशात प्रथम क्रमांक!"
"दहावी नापास… पण यशात प्रथम क्रमांक!"
एरंडोल – एक लहानसं, पण माणुसकीने परिपूर्ण असं गाव. याच गावातील एका सामान्य कुंभार कुटुंबात संजय विठ्ठल कुंभार यांचा जन्म झाला. घरात फारसं काही नव्हतं – ना संपत्ती, ना मोठ्या ओळखी. होते ते फक्त आई-वडिलांचे अथक कष्ट आणि संजयच्या डोळ्यांत सतत झळकणारी स्वप्नांची चमक.
त्यांचे वडील पारंपरिक कुंभार व्यवसायात रमलेले. सकाळी माती गोळा करणं, दुपारी चाकावर भांडी घडवणं आणि संध्याकाळी ती वाळवणं – हाच त्यांचा रोजचा जीवनक्रम. लहानपणापासून संजय या सगळ्याचा साक्षीदार होता. आईच्या हातातील जुनी फाटकी शाल, अंगावर साधे कपडे आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू – हीच त्याच्या बालपणातील खऱ्या संपत्तीची ओळख होती.
पण या साऱ्या परिस्थितीतही त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घोंगावत राहायचा – "हे आयुष्य असंच चालू राहणार का?" त्याच्या अंतर्मनात एक ठिणगी सतत पेटलेली असायची – "आपण काहीतरी वेगळं, काहीतरी मोठं करायला हवं!"
शाळेतील अभ्यास त्याला विशेषसा रुचला नाही. दहावीच्या परीक्षेत तो नापास झाला. घरच्यांच्या आशा क्षणभरातच कोसळल्या. वडिलांनी त्याला वीटभट्ट्यावर कामाला पाठवलं. रणरणत्या उन्हात माती मळणं, वीटा बनवणं आणि अंगावर गरम वाफा झेलणं – हे त्याचं नित्याचं काम झालं. मात्र त्याचं मन या सगळ्यांपासून दूर, कुठे तरी वेगळंच स्वप्न पाहत होतं.
संजयला लहानपणापासूनच गाड्यांचं विलक्षण आकर्षण होतं. गाड्यांचे आवाज, त्यांची रचना, इंजिनांचे कंपन – या साऱ्यात तो हरवून जायचा. एखादं जुनं ट्रॅक्टरसुद्धा त्याला संगीतमय भासत असे. म्हणूनच त्याने एका स्थानिक गॅरेजमध्ये शिकाऊ कामगार म्हणून पाऊल टाकलं. इथूनच सुरू झाली त्याच्या जीवनाची खरी घडामोड.
गॅरेजमधील प्रत्येक वाहन त्याने मनापासून हाताळलं. तो केवळ कामगार नव्हता, तर एक समर्पित विद्यार्थी होता. प्रत्येक सुटी, प्रत्येक स्क्रू, प्रत्येक आवाजातून तो काहीतरी शिकत होता. हळूहळू त्याच्या हाताला कौशल्य लागलं. अनुभव जमा झाला. थोडेसे पैसे जमवले, थोडं उधार घेतलं आणि उभं राहिलं त्याचं स्वतःचं स्वप्न – "कुणाल ऑटो गॅरेज."
सुरुवातीला फक्त एक तात्पुरतं शेड, काही मोजकी उपकरणं आणि मनात फक्त एक ठाम विश्वास –
"आपलं काम बोलकं असलं पाहिजे!"
आणि ते खरंच ठरलं. त्याच्या हातून दुरुस्त झालेल्या गाड्या गावभर सुसाट धावू लागल्या. लोकांनी त्याच्या प्रामाणिकपणाला, कष्टाला आणि कार्यतत्परतेला मान्यता दिली. 'कुणाल ऑटो गॅरेज'चं नाव गावाच्या सीमा ओलांडून पंचक्रोशीत पोहोचलं.
आज संजय कुंभार हे केवळ गॅरेजचे संचालक नाहीत, तर प्रेरणादायी उदाहरण आहेत. शिक्षणाचं प्रमाणपत्र नसतानाही, त्यांनी मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांची जिद्द यांच्या बळावर यशाचं दार स्वतःहून उघडलं.
समाजाने त्यांना ‘दहावी नापास’ या लेबलने हिणवलं, टोमणे मारले. पण त्यांनी कधीही त्या टोमण्यांना मनावर घेतलं नाही. उलट, त्यांनी आपली सर्व ऊर्जा आपल्या कामात ओतली. गरिबी ही त्यांचं अपयश नव्हतं – तीच त्यांच्या यशाची खरी प्रेरणा ठरली.
आज त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक तरुण कार्यरत आहेत. संजय त्यांना स्वतः प्रशिक्षण देतात, मार्गदर्शन करतात आणि रोजगारही पुरवतात. त्यांचं गॅरेज हे केवळ यांत्रिक सेवा देणारं केंद्र नसून अनेक तरुणांच्या भविष्यासाठी प्रेरणास्थान बनलं आहे.
संजय विठ्ठल कुंभार यांनी आजच्या तरुण पिढीला हे शिकवून दिलं आहे की –
"हातात गुणपत्रिका नसेलही, पण मेहनतीचा शिक्का असला, तर यश हमखास मिळतं!"
त्यांची ही कथा आपल्याला सांगते –
"शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं आहे – स्वप्नं बाळगणं आणि त्यासाठी अखंड झटणं!"
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा