जिद्दीच्या पावलांवर चाललेला मेंढपाळ... एक आयपीएस झाला!
जिद्दीच्या पावलांवर चाललेला मेंढपाळ... एक आयपीएस झाला!
एका सामान्य मेंढपाळाच्या पायाखालील माळरान कोरडं, खडतर आणि उन्हाळ्याच्या झळांनी भरलेलं होतं. पण त्याच्या डोळ्यांत मात्र एक स्वप्न दाटलेलं होतं – दिल्लीच्या राजपथावरून आत्मविश्वासाने चालणाऱ्या गणवेशातील अधिकाऱ्याचं! हे स्वप्न केवळ पहायचं नव्हतं, तर ते साकार करायचं होतं... आणि आज, ज्या पाळ्यावर बसून अभ्यास केला, त्याच पाळ्यावर त्याचा सत्कार एक आयपीएस अधिकारी म्हणून होत आहे. हा केवळ एक सन्मान नाही, तर समाजासाठी नव्या विचाराची पहाट आहे – “स्वप्नं सगळ्यांनाच दिसतात, पण त्यांच्यामागे धावणाऱ्यांनाच ती गवसतात.”
बिरदेव सिद्धपा डोने – कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावातील एका धनगर कुटुंबातील, साध्या मेंढपाळाचा मुलगा. अक्षर ओळख नसलेल्या आई-वडिलांच्या कुशीत वाढलेला हा मुलगा. जिथे शिक्षण ही चैनीची गोष्ट मानली जाते, अशा वातावरणात त्याने मात्र अभ्यासाला आपली दिशा बनवलं. मेंढ्यांसोबत डोंगर-दऱ्यांत फिरताना, उन्हातान्हात, अंगावर सावली नसताना, त्याने पुस्तकं हाती घेतली. ती पुस्तकं त्याचं भविष्य घडवत गेली.
UPSC सारखी देशातील सर्वात कठीण परीक्षा, कोचिंग क्लास नसताना, इंटरनेटची साधनं नसताना, फक्त जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर उत्तीर्ण करणे, हीच तर खरी क्रांती आहे! त्याच्या हातात काठी होती, पायात साध्या चपला होत्या, पण मनात गणवेशाच्या स्वप्नाची जळती मशाल होती. लोक हसले, शंका घेतल्या, पण त्याने थांबायचं नाही ठरवलं.
आज जेव्हा त्याचा सत्कार झाला, तेव्हा तो पंचतारांकित सभागृहात नव्हता. तो सत्कार झाला त्याच पाळावर – जिथे स्वप्नांची पेरणी झाली होती. त्या माळरानानेच त्याच्या जिद्दीला दिशा दिली होती. आणि म्हणूनच, त्या पाळावरचा हा क्षण इतिहास ठरला. तो केवळ बिरदेवचा विजय नाही, तर संपूर्ण धनगर समाजाचा, ग्रामीण भागातल्या प्रत्येक स्वप्नाळू तरुणाचा आणि स्वप्नं पाहून ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या प्रत्येक जिद्दीचा गौरव आहे.
हा सत्कार म्हणजे केवळ अभिनंदन नाही, तर तो एक संदेश आहे –
"तुझ्या पायांत चिखल असला तरी डोकं आभाळ गाठू शकतं!"
बिरदेव आज आयपीएस अधिकारी आहे. पण तो आजही आपली मूळ ओळख विसरलेला नाही. म्हणूनच त्याचा सत्कार झाला आपल्या माणसांत, मेंढ्यांच्या पाळावर. हा क्षण आहे – इतिहास, एक नव्या अध्यायाची सुरुवात, आणि लाखो स्वप्नांना नवी प्रेरणा देणारी नवी पहाट.
बिरदेवसारख्या पिढ्या बदलणाऱ्या स्वप्नांसाठी –
मनापासून साष्टांग नमस्कार!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा