"नात्यांच्या सावलीत फुललेलं जीवन – अशोक शंकर कानडे"
"नात्यांच्या सावलीत फुललेलं जीवन – अशोक शंकर कानडे"
एका लहानशा गावात, साध्या घरात आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्मलेली एक थोर माणूस—स्वर्गीय अशोक शंकर कानडे. कठीण परिस्थितींवर मात करत, नात्यांची वीण सांभाळत आणि सामाजिकतेचं व्रत उराशी बाळगून त्यांनी जगलेलं आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी गाथा होय.
त्यांचे वडील समाजसेवेत गुंतलेले होते आणि त्याच प्रेरणेतून लहानपणापासूनच अशोकजींच्या मनात समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ निर्माण झाली. आई-वडिलांचे कष्ट पाहत मोठं होत असताना, त्यांना बालवयातच कळून चुकलं की, "घराची प्रगती शिक्षणाशिवाय शक्य नाही."
त्या काळात शिक्षण हीच खऱ्या अर्थाने संपत्ती मानली जात असे. त्यांनी जुनी अकरावी परीक्षा पुणे बोर्डातून उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. नूतन मराठा कॉलेज, जळगाव येथे त्यांना सहज नोकरीची संधी मिळू शकत होती. परंतु, पाठीमागे आई-वडील, लहान भावंडं आणि संपूर्ण घराची जबाबदारी होती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या प्रगतीपेक्षा कुटुंबाच्या उभारणीला प्राधान्य दिलं आणि नोकरीकडे पाठ फिरवली.
ते केवळ स्वतःपुरते जगले नाहीत, तर आपल्या सर्व भावंडांचे पालनपोषण आणि शिक्षण ही त्यांनी पित्याच्या भूमिकेतून पार पाडलं. त्यांच्या मुलामुलींचे शिक्षण, संस्कार आणि विवाह या सर्व गोष्टी अत्यंत जबाबदारीने त्यांनी पार पाडल्या. त्यांनी एक सुसंस्कृत, सुसंगत आणि मजबूत कुटुंब घडवलं.
गावात त्यांचं एकच घर असलं, तरी त्यांच्या शब्दाला गावात मोठं महत्त्व होतं. त्यांचा स्वभाव सर्वांना समावून घेणारा, संयमी आणि मृदू होता. म्हणूनच गावकऱ्यांच्या मनात त्यांचं स्थान अढळ राहिलं. त्यांच्या सामाजिक बांधिलकीला आणि प्रामाणिक कार्याला मान्यता म्हणून त्यांची निवड आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील फूड सेल सोसायटी, कासोदा येथे संचालकपदी झाली आणि त्यांनी तब्बल दहा वर्षे ते पद निष्ठेने सांभाळलं.
डी. के. पाटील माध्यमिक विद्यालय, आडगाव या संस्थेचे ही ते विद्यमान संचालक होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे.
साधेपणा हेच त्यांच्या जीवनाचं खरे वैभव होतं. त्यांनी स्वतःचं आयुष्य जसं सुसंस्कृत पद्धतीने जगलं, तसंच त्यांनी आपल्या मुलांना, भावांना आणि समाजाला ही शिकवलं. त्यांनी कधी ही आपल्या कार्याचं कौतुक केलं नाही, पण त्यांच्या अस्तित्वाने अनेकांच्या आयुष्यात उजळपण आणलं.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, त्यांचे चिरंजीव श्याम कानडे हे ही समाजकार्यात सक्रिय राहिले. ग्रामपंचायत निवडणुकीत ते दोन वेळा निवडून आले, ही त्यांच्या वडिलांनी दिलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची पावतीच म्हणावी लागेल.
वयाच्या ७७व्या वर्षी अशोकजींनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचं कार्य, विचार, माणुसकीची ओळख आणि त्यांच्या प्रेमाची ऊब आज ही त्यांच्या कुटुंबाच्या, गावाच्या आणि सर्व समाजाच्या हृदयात ताजी आहे.
अशा थोर व्यक्तिमत्त्वाला शब्दांनी श्रद्धांजली वाहणं हे शब्दांचंच सौभाग्य आहे.
"पेरलं त्यांनी प्रेमाचं बीज,
उगवलं ते एक वटवृक्ष होऊन,
आज त्यांच्या सावलीत नाती विसावतात,
ते गेले असले तरी त्यांचं अस्तित्व आज ही जिवंत आहे."
स्वर्गीय अशोक शंकर कानडे यांना विनम्र अभिवादन आणि शब्दांनी साकलेली अश्रुपूरित श्रद्धांजली!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा