एक आदर्श शिक्षकाचा प्रकाशवाट !
एक आदर्श शिक्षकाचा प्रकाशवाट !
स्व. प्रा. दिनकर पुंडलिक मराठे (शेडगे) यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञान, त्याग, कष्ट, माणुसकी आणि निःस्वार्थ सेवेचा एक अनुपम संगम होय. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक या लहानशा खेड्यात एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेती करून उदरनिर्वाह करत असत, तर आई घरकाम आणि शेतीचे काम सांभाळून संसाराचा गाडा पुढे नेत होती.
लहान वयातच त्यांनी गरिबीचे तीव्र चटके अनुभवले. मात्र ती गरिबी त्यांच्या आत्मविश्वासाला कधीच खचवू शकली नाही. उलट तीच गरिबी त्यांच्या यशाची खरी प्रेरणा ठरली. बालपणापासूनच त्यांच्या मनात एक गोष्ट ठसली होती — "शिक्षणाशिवाय उन्नती नाही." त्यामुळे वडिलांना शेतात मदत करत, आईला घरकामात साथ देत, त्यांनी आपले शिक्षण कधीच थांबू दिले नाही.
ते तिघे भाऊ आणि दोन बहिणींमध्ये दोन नंबरचे होते. लहानपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळंच तेज होतं. अभ्यासात त्यांना विशेष गोडी होती. अंमळनेर आणि कोल्हापूरसारख्या शिक्षणाच्या केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी आपली शैक्षणिक घडण पूर्ण केली. शिक्षणात त्यांनी आपली प्रचंड मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश मिळवलं.
त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली, जेव्हा ते नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
प्रा. दिनकर मराठे हे केवळ एक शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे जिवलग मित्र, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. गणिता सारखा गुंतागुंतीचा विषय ते इतक्या सुलभ भाषेत समजावून सांगायचे, की विद्यार्थ्यांच्या मनात त्या विषयाबद्दल प्रेम निर्माण व्हायचं. त्यांची शिकवण्याची पद्धत, आवाजातील ठामपणा, आणि शब्दांतील आत्मीयता विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करून जायची.
स्वतःच्या आयुष्यात त्यांनी गरिबीचा संघर्ष अनुभवलेला असल्यामुळे, ते गरजू विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत असत. अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी त्यांनी स्वतःच्या खिशातून भरली – न कशाचं श्रेय घेत, न कुठला ही गाजावाजा करत. "माणूस मोठा पदाने नसतो, तर मनाने होतो" हे तत्त्व त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आचरणात आणलं.
शिक्षक असून ही त्यांनी कधी ही शेतीशी नाळ तोडली नाही. ते एक सच्चे शेतकरी होते. गावातील कुठला ही वाद, मतभेद वा न्याय निवाडा – ते अत्यंत शांतपणे, समजुतीने आणि निःपक्षपातीपणे हाताळत. त्यांचं बोलणं कमी, पण त्यांचा निर्णय गावासाठी अंतिम मानला जायचा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक असे सामर्थ्य होते, जे आवाजात नव्हे, तर कृतीतून व्यक्त होत असे.
वडील म्हणून ही त्यांनी एक प्रेरणादायी भूमिका बजावली. आपल्या पाच ही मुलींना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं आणि त्या सर्वांना स्वावलंबी बनवलं. "मुलींना शिकवून काय उपयोग?" अशा समाजातील जुनाट विचारांना त्यांनी आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर दिलं. त्यांच्या मुलींनी ही आज समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आज त्यांचे चिरंजीव डॉ. धीरजकुमार मराठे हे वडिलांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहेत. समाजसेवेची तीच तळमळ, गरिबांच्या डोळ्यातील आशा ओळखण्याची तीच संवेदना — आज ही त्यांच्या कृतीतून प्रकट होते.
प्रा. दिनकर मराठे यांनी केवळ ६२व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांचं योगदान, त्यांचे विचार, आणि त्यांनी घडवलेली माणसं — हीच त्यांच्या जीवनाची खरी संपत्ती आहे. आजही त्यांचे विद्यार्थी त्यांच्या आठवणीने भारावून जातात. त्यांच्या शिकवणुकीचा प्रकाश त्यांच्या जीवनाला दिशा देतो आहे.
आजच्या यांत्रिक शिक्षणपद्धतीच्या युगात, जेव्हा शिक्षक हा व्यवसाय म्हणून पाहिला जातो, तेव्हा प्रा. दिनकर मराठे यांच्या सारख्या शिक्षकांची प्रकर्षाने आठवण होते — ज्यांनी शिक्षणाला केवळ काम न मानता, एक पवित्र कार्य म्हणून संपूर्ण आयुष्य त्यात समर्पित केलं.
प्रा. दिनकर मराठे – हे नाव नव्हे, तर एका विचारांचा, मूल्यांचा आणि प्रेरणेचा उजळ प्रकाशवाट आहे.
ज्यांनी शिक्षणाच्या दीपाने कित्येक आयुष्यं उजळवली.
आज त्यांना मन:पूर्वक वंदन.
त्यांच्या पवित्र स्मृतींना आणि जीवनकार्याला
आपला साश्रू प्रणाम.
© शब्दांकन:दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा