"कुस्तीसाठी वाहिलेलं आयुष्य : पै.भानुदास नथू आरखे यांची प्रेरणादायी कहाणी"
"कुस्तीसाठी वाहिलेलं आयुष्य : पै.भानुदास नथू आरखे यांची प्रेरणादायी कहाणी"
शरीराच्या प्रत्येक पेशीत व्यायामाचं सामर्थ्य असलेल्या व्यक्ती जेव्हा एका ध्येयासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतात, तेव्हा त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायी राहत नाही, तर तो इतिहासात कोरला जातो. अशीच एक जिद्दीची, समर्पणाची आणि समाजसेवेची कहाणी आहे पै.भानुदास नथू आरखे यांची.
महाराष्ट्राच्या एरंडोल शहरात एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील पोस्टमन, घरगुती परिस्थिती साधी, पण त्यामध्ये ही मोठी स्वप्नं रुजवणारा मुलगा म्हणजे भानुदास. लहान वयातच शरीरसौष्ठव आणि व्यायाम यांच्या विषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. हळूहळू हाच व्यायाम कुस्तीमध्ये परावर्तित झाला आणि तीच त्यांची आयुष्याची दिशा ठरली. गावात, तालुक्यात, जिल्ह्यात... जिथे कुठे आखाडा मांडला गेला, तिथे ‘भानुदास’ नावाने एक वेगळाच आदर निर्माण झाला.
शिक्षणात ही ते मागे नव्हते. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतानाच त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःचं स्थान निर्माण केलं. मात्र त्यांची कुस्ती ही केवळ स्वतःपुरती मर्यादित नव्हती. ती एका चळवळी सारखी होती. पारंपरिक कुस्तीला नवी दिशा देण्याची.
१९९६ साली त्यांनी ‘एरंडोल कुस्तीगीर संघा’ची स्थापना केली. ह्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी नवोदित खेळाडूंना आखाडा, प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि संधी दिली. पुढे त्यांनी ‘गुरु हनुमान गीर कुस्ती संस्था’ सुरू केली आणि स्वतः अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल परिसरात कुस्ती पुन्हा एकदा बहरली. कित्येक युवकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य व राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली.
कुस्ती हे पुरुषप्रधान क्षेत्र असल्याचं समजलं जात असताना, भानुदास सरांनी महिलांना या खेळात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये मुलींना कुस्तीचे धडे दिले, त्यांना स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केलं. ही कृती त्या काळी केवळ क्रांतिकारी नव्हती, तर एक सामाजिक परिवर्तन होतं.
त्यांची पंचगिरी देखील तितकीच आदर्शवत राहिली. २००१ पासून ते महाराष्ट्र राज्य पंच पॅनलचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून कार्य केलं. त्यांच्या निर्णयात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कुस्तीविषयीची गाढ निष्ठा ही नेहमीच जाणवते. त्यांच्या आवाजात शांतता असते, पण नजरेत काटेकोर निरीक्षण. मैदानात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असतं.
२०१० पासून ते जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे तांत्रिक सचिव आहेत. या भूमिकेतून त्यांनी शेकडो स्पर्धांचं नियोजन, पंच व प्रशिक्षकांमधील समन्वय, खेळाडूंची निवड अशा अनेक जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने पार पाडल्या. त्यांच्या कार्यशैलीत कुठे ही गोंधळ नाही, ना अहंकार फक्त एक शांत, स्पष्ट आणि शिस्तबद्ध प्रवाह.
आज त्यांच्या वयाला जरी काही वर्ष झाली असतील, तरी ही त्यांची उत्स्फूर्ती, डोळ्यांतील चमक, आणि कुस्तीविषयीचं प्रेम तेवढंच टिकून आहे. त्यांनी पुरस्कार, गौरव, प्रसिद्धी यांची कधी अपेक्षा ठेवली नाही. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुस्तीला आणि युवकांच्या घडवणुकीला समर्पित केलं.
भानुदास सरांचं जीवन हे एक मूक क्रांती आहे – ग्रामीण भागातील तरुणांना दिशा देणारी, महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणारी आणि पारंपरिक खेळाला नवसंजीवनी देणारी. काही लोक स्वतः विजेते होतात, पण काही लोक इतरांना विजेता बनवण्यासाठी आयुष्य खर्च करतात. भानुदास आरखे हे अशा थोर कर्मयोग्यांपैकी एक आहेत.
त्यांचं आयुष्य आजच्या तरुण पिढीसाठी एक मौल्यवान शिकवण आहे –
"ध्येयासाठी झटताना, स्वतः हरलात तरी चालेल,
पण इतरांना जिंकवत राहा... कारण तेच खरं यश असतं."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा