"साधेपणातून घडलेला सोन्यासारखा माणूस"
"साधेपणातून घडलेला सोन्यासारखा माणूस"
एरंडोलसारख्या एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नारायण रामचंद्र मोरे हे नाव आज गावात आदराने घेतले जाते. आजच्या चकचकीत युगात, जिथे मोठेपणाच्या व्याख्याच वेगळ्या झाल्या आहेत, तिथे मोरे साहेबांचे आयुष्य हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
मोरे कुटुंबाची पारंपरिक सोनारी कामाची पार्श्वभूमी, त्यातच थोडीशी शेती घरात फारशी आर्थिक सक्षमता नव्हती. तरी ही त्यांचे वडील कष्ट करीत राहिले. आपल्या मुलाला शिकवायचे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय. गरिबीच्या छायेखाली ही त्यांनी आपल्या मुलाला जिद्दीने पदवीधर केले.
या वडिलांच्या कष्टांची जाणीव नारायणरावांना लहानपणापासूनच होती. म्हणूनच त्यांनी शिक्षणात सातत्य, वागण्यात नम्रता आणि मनात प्रामाणिकपणा जपला. या गुणांच्या आधारावरच त्यांनी एस.टी. महामंडळात लेखापाल (Accountant) म्हणून आपली ओळख निर्माण केली.
त्यांच्यासाठी नोकरी ही केवळ पगाराची साधनाच नव्हती, तर ती एक जबाबदारी होती. स्वतःबरोबर इतरांना ही बरोबर घेऊन चालण्याची. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधी ही चुकीच्या मार्गाला साथ दिली नाही. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध, वरिष्ठांचा सन्मान, कनिष्ठांचा आदर – हे त्यांच्या स्वभावाचे ठळक विशेष होते.
वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली, पण त्यांच्या आयुष्याचा प्रवास तिथे थांबला नाही. उलट, एक नवा अध्याय सुरू झाला.समाजासाठी जगण्याचा. आज वयाच्या ६३व्या वर्षी ही ते गावातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. कोणती ही प्रसिद्धी नको, फक्त लोकांचे प्रश्न ऐकून, समजून घेऊन, योग्य तो सल्ला देणे – हेच त्यांच्या सेवाभावाचे खरे स्वरूप आहे.
आपल्या मुलांना त्यांनी केवळ शिक्षणच दिले नाही, तर त्यांना जीवनमूल्यांचाही ठेवा दिला. दोन्ही मुलं बी.ई. झाली, त्यातील एक एम.एस. करून अमेरिकेत यशस्वी करिअर करत आहे. प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते की, त्यांचे मूल स्वबळावर उभे राहावे – मोरे साहेबांनी ते स्वप्न यशस्वीपणे साकारले.
इतकी मोठी साधना करून ही त्यांच्यात गर्वाचा लवलेशही नाही. साधी राहणी, साधं बोलणं, आणि साधं जीवनदर्शन – त्यांचं व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वांशी आत्मीयतेने ते वागतात.
आज त्यांच्या जीवनगाथेची कुठे ही ढोलबजावपणाने जाहिरात होत नाही. वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे फोटो नाहीत, ना समाजमाध्यमांवर व्हायरल पोस्ट्स. पण त्यांच्या गावात, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ते प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
"त्यांचे आयुष्य म्हणजे एका शेतकऱ्याच्या स्वप्नाची साकार झालेली आकृती, एका मुलाच्या जिद्दीचे फलित आणि एका माणसाच्या साधेपणात लपलेली खरी महानता."
ते एक साधे व्यक्ती आहेत. पण त्यांचे साधेपण हेच त्यांच्या जीवनाचे खरे तेज आहे.
त्यांचं आयुष्य नाटकी नाही, पण निश्चितच प्रत्येकाच्या आयुष्यात काही तरी शिकवून जाणारं आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा