कष्टांच्या पायऱ्यांवरून उंच भरारी घेणारा – प्रथमेश महाजन

कष्टांच्या पायऱ्यांवरून उंच भरारी घेणारा – प्रथमेश महाजन

धानोरा, तालुका चोपडा हे एक छोटंसं, पण मनाने मोठं गाव. याच गावात जन्मलेला प्रथमेश शशिकांत महाजन नावाचा एक साधा मुलगा, आज ठाणे सारख्या प्रगत शहरात आपल्या मेहनतीच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करून उभा आहे. कोणाला ही वाटलं नसतं की एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण, आयुष्याच्या रणांगणात इतक्या आत्मविश्वासाने झुंज देईल आणि यशाच्या शिखरावर पोहोचेल.

प्रथमेश यांचा जन्म एका साध्या, कष्टकरी कुटुंबात झाला. वडील शिक्षण घेतलेले असून ही रोजगार मिळत नसल्याने रिक्षा चालवायचे. आई घरची जबाबदारी खांद्यावर घेऊन संसार सांभाळायची. अशा परिस्थितीत प्रथमेशचं बालपण कष्टाने आणि जबाबदारीने भारलेलं होतं. लहान वयातच त्याला कळून चुकलं "फक्त स्वप्नं पाहून काही होत नाही, ती सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात."

त्या जाणिवेनेच प्रेरित होऊन प्रथमेशने शिक्षणात सातत्य ठेवलं. दिवसा शाळा, संध्याकाळी आई-वडिलांना मदत असा त्याचा दिनक्रम असायचा. परिस्थितीने किती ही आव्हानं दिली, तरी त्याने शिक्षणाचा पाय सोडला नाही. त्याचे वडील त्या काळात ठाण्यात रिक्षा चालवायचे. घरच्यांची गरज, मुलाचा उज्ज्वल भवितव्य – हे दोन्ही सांभाळताना त्यांनी कोणती ही तक्रार न करता फक्त झगडणं स्वीकारलं.

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रथमेशचे आई-वडील पुन्हा आपल्या मूळगावी धानोरा येथे परतले. प्रथमेशने त्यांच्या सोबत राहून बी.एस्सी. (अ‍ॅग्री) चे शिक्षण पूर्ण केलं. परंतु त्याच्या मनात काही तरी वेगळंच होतं. शेतीच्या ज्ञानासोबतच त्याला स्वतःच्या आयुष्याला वेगळी दिशा द्यायची होती.थोडक्यात, आयुष्यात काही तरी मोठं करायचं होतं.

हीच जिद्द घेऊन तो पुन्हा ठाण्याकडे वळला. या वेळी त्याच्या हातात अनुभव नव्हता, पण मनात विश्वास प्रचंड होता. आणि होता आई-वडिलांचा आशीर्वाद. ठाण्यात आल्यावर त्याने ‘ओम साई प्रॉपर्टी’ या नामांकित रिअल इस्टेट कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाची सुरुवात केली.

ठाणेसारख्या गजबजलेल्या, स्पर्धात्मक शहरात टिकून राहणं हे सोपं काम नव्हतं. पण प्रथमेशचा प्रामाणिक स्वभाव, माणसांशी आपुलकीने जोडणं, आणि कामाला दिलेलं समर्पण यामुळे तो लवकरच सर्वांच्या लक्षात आला. त्याचे मालक, श्री. धीरज बगळ साहेब, यांनी त्याच्या गुणांचं मोठं कौतुक केलं. त्यांनी प्रथमेशला आपल्या लहान भावाप्रमाणे जपलं आणि प्रोत्साहन दिलं.

आज प्रथमेश केवळ एक यशस्वी सेल्स एक्झिक्युटिव्ह नाही, तर आपल्या कष्टाळू प्रवासाने अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्याने केवळ स्वतःचं करिअर घडवलं नाही, तर आपल्या आई-वडिलांच्या कष्टांना योग्य तो सन्मान दिला आहे. एकेकाळी झोपडीतून जीवनाची सुरुवात करणाऱ्या आई-वडिलांना आज अभिमानाने जगता येतं आणि हेच खरं यश.

प्रथमेशची ही कहाणी एखाद्या चित्रपटात शोभेल अशी वाटते, पण ती आहे.सत्य आणि प्रेरणादायी. ही आहे एका खऱ्या लढवय्याची कथा. त्याने आयुष्याच्या प्रत्येक अडथळ्याला सामोरं जात, त्यांच्यावर मात करत, स्वतःची वाट निर्माण केली.

आज तो स्पष्ट सांगतो "स्वप्नं पाहा, पण झोपेच्या आहारी न जाता त्या स्वप्नांसाठी लढा. रस्ता खडतर असतो, पण पायात मेहनतीचे बूट असले, तर कोणतं ही शिखर दूर राहत नाही."

प्रथमेश महाजनचं आयुष्य म्हणजे एका कष्टकरी कुटुंबाच्या स्वाभिमानाची जिवंत झलक आहे. त्याच्या यशामागे केवळ त्याचा प्रयत्न नाही, तर त्याच्या आई-वडिलांच्या प्रत्येक अश्रूचं, त्यागाचं आणि कष्टाचं सोनं झालेलं स्वप्न आहे....

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !