डॉक्टर पांडुरंग पिंगळे : एक जीवंत देवदूत!


डॉक्टर पांडुरंग पिंगळे : एक जीवंत देवदूत!

माणुसकीच्या गंधाने भारलेली काही व्यक्तिमत्त्वं समाजाच्या अंतःकरणात अशी खोलवर रुजतात, की त्यांच्या कार्याच्या तेजाने देवत्वही लाजावं. अशाच थोर, पण अत्यंत साध्या व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. पांडुरंग पिंगळे.

कासोदा ता. एरंडोल या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय किराणा माल विकण्याचा. ते खेडोपाड्यांतून फिरत, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी झटत असत. घरची परिस्थिती बेताची होती. दैनंदिन गरजा ही मोठ्या कष्टाने पूर्ण होत असत. याच दारिद्र्याच्या सावलीत पांडुरंगरावांचं बालपण घडलं.

अतिशय कोवळ्या वयातच त्यांना मातृछत्र गमवावं लागलं. केवळ दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यामुळे त्यांचं बालपण आईच्या मायेपासून वंचित राहिलं. मात्र वडिलांच्या झिजलेल्या हातातून, त्यांच्या निःस्वार्थ कष्टातून त्यांनी जीवनाची खरी ओळख घेतली. घरातील गरिबी, वडिलांची धडपड आणि स्वतःचं भविष्य उभारायचं स्वप्न या साऱ्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजल्या.

"घराची परिस्थिती सुधारायची असेल, तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे," हे त्यांनी लहानपणापासूनच आत्मसात केलं. कुठल्या ही शॉर्टकटचा अवलंब न करता, कोणत्या ही मदतीची अपेक्षा न ठेवता, त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर शिक्षणाची वाट चालायला सुरुवात केली.

बालवयापासूनच त्यांना डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती. यवतमाळ येथील आयुर्वेद महाविद्यालयात त्यांचा प्रवेश निश्चित झाला. वडिलांचे कष्ट आणि त्याग आता सार्थकी लागत होते. त्यांनी आपलं शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलं आणि डॉक्टर पांडुरंग पिंगळे या नावाने एक नवा अध्याय सुरू झाला.

सन १९७६ मध्ये त्यांनी आपल्या जन्मगावीच – कासोदा येथे स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. मात्र डॉक्टरकी
त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नव्हती. ती एक सेवाभावाची व्रतस्थ वाटचाल होती. त्यांनी ठाम निर्णय घेतला – "अंध व अपंग बांधवांकडून कधीच फी स्वीकारायची नाही."

या निर्णयावर त्यांनी आज पर्यंत कठोरपणे अमल केला आहे. गेली अनेक दशके, कुठल्या ही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, त्यांनी हे कार्य निःस्वार्थ भावनेने सुरु ठेवलं आहे.

त्यांचं एक वाक्य कायमच त्यांच्या ओठांवर असतं –
"रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा!" आणि त्यांनी हे वाक्य केवळ बोलून दाखवलेलं नाही, तर जीवनभर ते जगून दाखवलं आहे.

आज ही तीर्थयात्रांच्या काळात पद्मालय, मनुदेवी, सप्तशृंगी गड, नस्तंपूर यांसारख्या धार्मिक स्थळी ते स्वतः जाऊन मोफत वैद्यकीय सेवा देतात. यात्रेकरूंच्या आरोग्यासाठी ते रात्रंदिवस झटतात.

याच बरोबर, जेव्हा खिल्लारी भूकंप झाला किंवा बिहार मधील कोसी नदीने तांडव केलं, तेव्हा त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या मागे ठेवून त्या भागात जाऊन पूरग्रस्त व आपत्तिग्रस्तांसाठी अविरत सेवा केली. त्यांच्या त्या सेवेमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली.

त्यांच्या या कार्याची दखल घेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांचा सन्मान केला. पण डॉ. पिंगळेंना सन्मान, पुरस्कार यांत फारसा रस नाही. त्यांच्या दृष्टीने खरी पावती म्हणजे एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर परतलेलं हास्य, वेदनामुक्त शरीर, आणि त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यांत उमटलेला "धन्यवादाचा भाव."

आज ही ते अत्यंत साधेपणाने राहतात. त्यांच्या कार्यात नाटकीपणा नाही, प्रसिद्धीचा हव्यास नाही, केवळ नि:स्वार्थ सेवा आहे. त्यामुळेच जनमानसात त्यांचं स्थान अत्यंत आदरणीय आहे.

डॉ. पांडुरंग पिंगळे हे नाव आज केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या मूर्तिमंत प्रतीकासारखं ओळखलं जातं. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्यात घालवलं आहे. त्यांनी सेवा म्हणजेच धर्म हे सिद्ध करून दाखवलं.

त्या एका माणसाने दिवा पेटवला —जो अंधारात हरवलेल्यांसाठी आशेचा किरण ठरतो,ज्याचं तेज कुणाचं जीवन उजळवतं,आणि आपल्याला आठवण करून देतं "सेवा हाच खरा धर्म आहे!"

डॉ. पांडुरंग पिंगळेंच्या जीवनातील हा प्रकाश आपल्याला मार्गदर्शक ठरावा हीच सदिच्छा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !