जिद्दीची ज्योत : सौ.ज्योती खैडकर यांची प्रेरणादायी जीवनकहाणी


जिद्दीची ज्योत : सौ.ज्योती खैडकर यांची प्रेरणादायी जीवनकहाणी

कुंभार समाजातून आलेल्या सौ. ज्योती खैडकर यांचा गरिबीपासून आत्मनिर्भरतेकडे झालेला प्रवास एक जिद्द, संघर्ष आणि यशाची उजळलेली वाटचाल.

"जन्म नशिबावर ठरतो," असं म्हटलं जातं. मात्र काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने नशिबाला ही वाकवतात. सौ. ज्योती खैडकर यांची ही कहाणी म्हणजे अशाच एका धैर्यवान, जिद्दी आणि आत्मविश्वासू स्त्रीची प्रेरणादायी जीवनगाथा ज्यांनी स्वतःच्या प्रवासात संघर्षाची ठिणगी जपून यशाचा दिवा प्रज्वलित केला.

महाराष्ट्रातील रावेर या छोट्याशा गावात, कुंभार समाजात सौ.खैडकर यांचा जन्म झाला. वडील वीटभट्टीवर मजुरी करणारे. घरात पाच बहिणी, एक भाऊ आणि सतत जाणवणारी आर्थिक तंगी. त्याकाळी मुलगी जन्माला येणं दु:ख मानलं जात होतं. मात्र सौ. खैडकर यांचे डोळे मात्र वेगळ्याच स्वप्नांनी उजळलेले होते. शिक्षण घेऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं.

घरात अन्नाचे ही हाल असताना त्या अभ्यासात मागे राहिल्यात नाहीत. दिवसभर छोटेमोठे काम करून, रात्रीचा वेळ अभ्यासाला देत त्यांनी दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या बहिणींना शिक्षण घेता आलं नाही, पण सौ.खैडकर यांनी त्यांच्या वाटचालीत प्रेरणा व्हायचं स्वप्न मनाशी बाळगलं.

लग्नानंतर वाटलं, आता स्थिरता लाभेल. पण खरं आव्हान तिथूनच सुरू झालं.

लग्नानंतर मुलीच्या जन्मानंतर त्या ठाणे शहरात स्थलांतरित झाल्या — खिशात पैसे नव्हते, ओळखी नव्हत्या, पण मनात प्रचंड जिद्द होती. "मुलगी असून काय झालं? मी स्वतः काही तरी करून दाखवेन," ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत राहिली.

सुरुवातीला त्यांनी घरकाम, मजुरी, साफसफाई अशी कोणतीही लाज न बाळगता कामे स्वीकारली. पण त्यांच्या मनात एकच ध्यास होता. स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा.

पुरुषप्रधान, अवघड आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. “आशापुरा इस्टेट एजन्सी” या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला लोकांच्या मनात शंका होत्या "कुंभार समाजातील, घरकाम करणाऱ्या स्त्रीला हे जमेल का?" पण त्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवहार, वेळेचं काटेकोर नियोजन आणि माणसांशी असणारी आत्मीयता यांच्या जोरावर समाजाचा विश्वास मिळवला.

त्यांच्या बोलण्यात नेहमीच सौम्यता, त्यांच्या कृतीत नितिमत्ता आणि त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनात परिपक्वता दिसून आली. हळूहळू “आशापुरा इस्टेट एजन्सी” नावारूपाला आली. सौ. ज्योती खैडकर यांचे नाव ठाणे शहरात आदराने घेतले जाऊ लागले. एक यशस्वी उद्योजिका, एक मार्गदर्शक, आणि अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून.

सौ. ज्योती खैडकर सध्या ‘आशापुरा इस्टेट एजन्सी’मध्ये (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह) म्हणून कार्यरत आहेत. त्या केवळ व्यवसायिक क्षेत्रातच नव्हे, तर समाजकार्यात ही सक्रियपणे सहभागी होतात. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. गरजू महिलांना योग्य मार्गदर्शन, आवश्यक मदत आणि स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी मानसिक बळ देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

त्यांची ही कहाणी केवळ एका स्त्रीच्या यशाची गाथा नाही, तर हजारो महिलांसाठी एक आशेचा किरण आहे. त्यांनी जगाला दाखवून दिलं की किती ही कठीण परिस्थती असली, तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश नक्की गाठता येतं.

सौ.खैडकर आज ही आपली मुळे विसरलेल्या नाहीत. समाजकार्य, विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या आज ही सक्रिय आहेत. गरजू महिलांसाठी मार्गदर्शन, मदत आणि सन्मानाने जगण्याचं बळ देणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

त्यांच्या कार्याला आणि धैर्याला मनापासून सलाम.

त्यांची कहाणी हेच शिकवते की संघर्ष अटळ असतो, पण त्याला घाबरून थांबण्या पेक्षा, धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. मार्ग कठीण असतो, पण सातत्याने चालत राहिलं, तर तो आपोआप तयार होतो.

सौ. ज्योती खैडकर यांना मन:पूर्वक वंदन आणि शुभेच्छा  त्यांच्या यशाचा प्रकाश आणखी अनेक स्त्रियांच्या जीवनात प्रेरणेची ज्योत पेटवो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !