दानशीलतेच्या पायवाटेवर चालणारा एक तेजस्वी प्रकाश — दादासाहेब बाबुराव गोबाजी चौधरी

दानशीलतेच्या पायवाटेवर चालणारा एक तेजस्वी प्रकाश — दादासाहेब बाबुराव गोबाजी चौधरी

खरा मोठेपणा माणसाच्या पदावरून नव्हे, तर त्याच्या मनाच्या विशालतेवरून ओळखावा लागतो. दादासाहेब बाबुराव गोबाजी चौधरी हे या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. तेजस्वी, प्रामाणिक आणि सच्च्या विचारांनी भरलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी एक दीपस्तंभ ठरले आहे.

दादासाहेबांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील एका साध्या, कष्टकरी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण जळगाव येथेच झाले. बालपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी आणि माणुसकीची झळाळी दिसून येत होती. त्यांच्या वडिलांचा शेती व्यवसाय होता, पण त्यांच्या मनात उपजतच दानशीलता होती. त्यांच्या आजोबांनी तेली समाजासाठी जळगावमध्ये दिलेली जागा, जिथे आज एक भव्य व्यापारी संकुल आणि समाजोपयोगी कार्यालय कार्यरत आहे, ही त्यांच्या कुटुंबाच्या समाजसेवी वारशाची साक्ष देणारी आहे.

१९६६ साली दादासाहेबांनी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. अनेकांसाठी सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य, पण दादासाहेबांसाठी ती सेवा होती. पुढे त्यांची बदली नाशिक येथे झाली आणि नाशिक हीच त्यांच्या कार्याची खरी कर्मभूमी ठरली. त्यांनी फक्त एक सरकारी अधिकारी म्हणून नव्हे, तर एक प्रभावी समाजसेवक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

आरोग्य विभाग, नाशिक येथे कार्यालयीन अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ही त्यांच्या सामाजिक कार्याला विलंब न करता नवसंजीवनी मिळाली. बालपणापासून मनात रुजलेली समाजसेवेची भावना आता प्रत्यक्षात साकार झाली.

दादासाहेबांनी "श्री संत जगनाडे महाराज संस्थान, सिडको, नाशिक" या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने समाजातील वंचित, गरजू आणि शिक्षणापासून दूर असलेल्या घटकांसाठी अन्नदान, वस्त्रवाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे उपक्रम यांसारखे अनेक विधायक उपक्रम राबवले.

त्यांच्या सहवासातून आजवर ५० ते ५५ तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. हे तरुण आज विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय आहेत. काहींनी स्वयंपूर्णता मिळवली आहे, तर काहींनी समाजकार्यासाठी स्वतःच्या व्यावसायिक संधीही मागे सारल्या आहेत. हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती म्हणावी लागेल.

दादासाहेबांचे विचार नेहमी स्पष्ट, शांत आणि सर्वसमावेशक असतात. ते नेहमी म्हणतात, "दान करताना हात मोठा असावा, पण त्याचा गवगवा नसावा." त्यांच्या जीवनशैलीतही ही शिकवण ठळकपणे जाणवते. त्यांचा साधेपणा, नम्रता आणि परोपकाराचा स्वभाव प्रत्येक वागण्या-बोलण्यातून प्रतिबिंबित होतो.

त्यांनी केवळ स्वतःच नव्हे, तर आपल्या कुटुंबाला ही समाजसेवेच्या मार्गावर घडवले आहे. त्यांच्या मुलांनी ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सेवा आणि दानधर्माची परंपरा पुढे चालवली आहे. हीच बाब त्यांच्या जीवनातील सर्वांत मोठा पुरस्कार ठरते.

दादासाहेबांनी आरोग्य विभागात कार्यरत असताना सुमारे ५० ते ५५ तरुणांना नोकरीस लावण्याचे कार्य केले आहे. गेली २५ वर्षे "श्री संताजी महाराज" यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण कार्यक्रम त्यांच्याच सौजन्याने दरवर्षी आयोजित केला जातो. नाशिक महानगर क्षेत्रात तेली समाजासाठी स्वतंत्र कार्यालयाची कमतरता त्यांच्या मनाला कायम खंत देत होती. ही खंत दूर करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी १७००० चौरस फूट जागा आपल्या सौजन्याने समाजासाठी विकत घेतली आहे. त्या जागेवर भव्य मंगल कार्यालय उभारण्याचा आराखडा मंजूर झाला असून, लवकरच त्याचे बांधकाम सुरू होणार आहे.

"नाशिक हीच माझी कर्मभूमी," असे ते म्हणतात. “सोबत काहीच येत नाही, परंतु ‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे’ या उक्तीप्रमाणे समाजासाठी काही मोठे कार्य माझ्या हातून व्हावे,” ही त्यांची कायमची प्रार्थना असते.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेताना मन अभिमानाने भरून येते. अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला केवळ शुभेच्छा देणे पुरेसे नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी, हेच खरे त्यांना दिलेले गुरुदक्षिणेचे रूप ठरेल.

दादासाहेब बाबुराव गोबाजी चौधरी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपली प्रेरणा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचो, आणि आपल्या कार्याचे तेज समाजाच्या मनामनात प्रकाशमान होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

© दीपक पवार (संपादक)खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !