सामाजिक समर्पणाचा सात्त्विक प्रवास:संजय आनंदा बागड
सामाजिक समर्पणाचा सात्त्विक प्रवास:संजय आनंदा बागड
साधेपणा, सात्त्विकता आणि समाजकार्य या त्रिसूत्रीचा वारसा घेऊन जगणारी काही माणसं असतात, ज्यांचं संपूर्ण आयुष्यच प्रेरणादायी ठरतं. अशाच व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे संजय आनंदा बागड. एरंडोल तालुक्यातील फरकांडे या छोट्याशा गावात अत्यंत सामान्य आणि गरिबीत ही स्वाभिमानाने जगणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
त्यांचे वडील शेतीकाम करणारे श्रमजीवी तर त्यांच्या आईच्या पदराखाली त्यांनी कष्ट, संस्कार आणि माणुसकी यांचा वारसा घेतला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असली तरी संजयजींचे स्वप्न मोठं होतं. घर उभं करायचं, आयुष्य घडवायचं. आणि हे शक्य आहे, फक्त शिक्षणाच्या बळावर, हे त्यांनी बालपणातच ओळखलं.
आई-वडिलांना शेतीत मदत करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. सकाळी शाळा, दुपारी शेतात काम, संध्याकाळी अभ्यास ही त्यांच्या बालपणाची दिनचर्या होती. अनेक अडचणी आल्या, संकटं ओढवली, पण संजय बागडांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या डोळ्यांतील आईच्या श्रमांची जाणीव आणि मनातील समाजासाठी काही तरी करून दाखवण्याची तळमळ यांचं बळ त्यांच्या पाठीशी होतं.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या गावात “नेहरू युवा मंडळ” स्थापन केलं. युवकांना सकारात्मक विचार आणि कृतीसाठी एकत्र आणलं. समाजहितासाठी विविध उपक्रम हाती घेतले. त्याच बरोबर “शाकाहार परिषद फरकांडे”चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. समाजासाठी झटणाऱ्या या तरुण नेत्याने प्रत्येक काम मनापासून केलं आणि समाजाला ही त्याच्या प्रयत्नांची पावती दिली.
त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि आजवर त्यांना २८ वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र ते नम्रपणे म्हणतात, “हे माझं यश नाही, हे माझ्या गावाचं, माझ्या आई-वडिलांच्या कष्टांचं आणि समाजाच्या विश्वासाचं यश आहे.”
सध्या संजय बागड संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र, एरंडोल येथे सचिव म्हणून कार्यरत आहेत. व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या शेकडो लोकांना त्यांनी नवजीवन दिलं आहे. व्यसनमुक्त आयुष्याकडे वाटचाल करणाऱ्या अनेक कुटुंबांना त्यांनी आशा आणि आधार दिला आहे.
या शिवाय, एरंडोल तालुका पत्रकार संघटनेचे सचिव म्हणून ही ते कार्यरत आहेत. निडरपणे सत्य मांडण्याची आणि पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे.
त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे नम्रता, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या गळ्यात पदकं नसली, मानपत्रं नसतील, तरीही लोकांच्या मनात त्यांच्या कार्याची नोंद सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहे. ते कुठल्या ही गाजावाजात रमले नाहीत. “काम बोलतंय” हेच त्यांच्या आयुष्याचं खरं ब्रीदवाक्य आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून एकच भावना व्यक्त होते "समाजाला संजय बागडांसारखे निःस्वार्थ कार्यकर्ते लाभणं ही खरी संपत्ती आहे."
त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, ऊर्जा आणि अजून समाजहितासाठी प्रेरणा देवो! जग बदलण्यासाठी मोठं पद लागत नाही, मोठं मन लागतं आणि संजय बागड यांचं मन खरंच विशाल आहे.
संजयजी, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा