एक साधा माणूस, असामान्य आठवणी — स्वर्गीय शिवाजी काशीराम धोबी (निकुंभ)
एक साधा माणूस, असामान्य आठवणी — स्वर्गीय शिवाजी काशीराम धोबी (निकुंभ)
कधी कधी काही व्यक्तींचं आयुष्य हे एक शांत, खोल अर्थाने भारलेलं गाणं असतं ज्यात कष्टांची लय, साधेपणाचा सूर आणि माणुसकीची गोडी गुंफलेली असते. स्वर्गीय शिवाजी काशीराम धोबी (निकुंभ) यांचं जीवन ही असंच एक गाणं होतं, जे ऐकताना अंतःकरण हेलावून जातं.
जळगाव जिल्ह्यातील आडगाव या छोट्याशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात चैन नव्हती, श्रीमंती नव्हती, आणि लहान वयातच आईचं छत्र हरपल्यामुळे वात्सल्याचा आधार नव्हता. पण त्यांच्या मनात होती ती जिद्द, काही तरी मोठं करून दाखवायची आस आणि स्वतःच्या पायावर उभं राहायची तळमळ. वडिलांनी शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आणि त्यांची ती रात्रंदिवसाची मेहनत शिवाजीभाऊंच्या मनावर कोरली गेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक विचार ठामपणे रूजला "घराची प्रगती हवी असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही."
स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. घरातील जबाबदाऱ्या पेलत, परिस्थितीशी झगडत त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये वायरमन म्हणून नोकरीला लागले. पद लहान असलं, तरी त्यांचं मन मोठं होतं."माणूस मोठा पदाने नव्हे, तर मनाने मोठा असतो," हे त्यांनी आपल्या वागणुकीतून सतत सिद्ध केलं.
ते केवळ एक कर्मचारी नव्हते, तर आपल्या सहकाऱ्यांचे सच्चे मित्र, मार्गदर्शक आणि विश्वासू सहकारी होते. लोकांचे प्रश्न समजून घेणे, आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे आणि कोणत्या ही अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभं राहणे, हे त्यांच्या स्वभावाचे खास गुण होते. त्यांच्या साधेपणातून ही माणुसकीचा तेजस्वी प्रकाश झळकत असे. त्यांच्या सहवासात प्रत्येकाला आपलेपणा वाटत असे.
शिवाजीभाऊंना बालपणापासून कुस्तीचा विशेष छंद होता. गावातील यात्रां मधील कुस्त्यांपासून ते विभागीय स्पर्धांपर्यंत त्यांनी आपल्या खेळातून नाव कमावलं. कुस्ती हा फक्त खेळ नव्हता, तर त्यांच्यासाठी ती एक जीवनशैली होती शिस्त, संयम आणि मेहनतीचा प्रतीक. त्यांनी या खेळातून आत्मिक बळ मिळवलं. यश मिळवून ही त्यांनी कधी गर्व केला नाही, उलट समाजासाठी तो एक अभिमानाचा विषय बनवला.
वयाच्या ७६व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने आडगाव गावाने एक कणखर, सच्चा आणि मनमिळावू माणूस गमावला. पण त्यांच्या आठवणी, त्यांच्या जीवनमूल्यांचा वारसा आज ही त्यांचे चिरंजीव दीपक आणि किरण यांच्या जीवनातून जिवंत आहे. हे दोघं ही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, प्रामाणिकपणे व निष्ठेने आपल्या आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
‘शिवाजीभाऊ’ हे केवळ एक नाव नव्हे, तर एक प्रेरणा आहे. त्यांनी न सांगता खूप काही शिकवून गेलं कष्टात ही प्रतिष्ठा असते, साधेपणात ही तेज असतं आणि
माणुसकीतच खरा देव असतो.
आज त्यांची आठवण डोळे ओलावते, पण त्याच वेळी मनाला उबही मिळते त्या माणसाची, ज्याचं संपूर्ण आयुष्य इतरांसाठी दीपस्तंभासारखं होतं.
"जगण्यातली गाठ बांधली होती कष्टांशी, आणि म्हणूनच त्यांचं नाव आज ही आठवणींच्या मनगटात कोरलेलं आहे."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा