सेवानिवृत्ती–एका प्रवासाचा थांबा, दुसऱ्या प्रवासाची सुरुवात

सेवानिवृत्ती–एका प्रवासाचा थांबा, दुसऱ्या प्रवासाची सुरुवात

आज नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालयात एक अत्यंत भावूक आणि मनाला स्पर्श करणारा क्षण अनुभवास आला. आपल्या सेवेत नितांत प्रामाणिकपणे, शांतपणे आणि निष्ठेने कार्य करणारे आदरणीय श्री. सदाशिव फकिरा गोलाईत यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाला.

हा क्षण केवळ एका व्यक्तीच्या सेवानिवृत्तीचा नाही, तर एका प्रदीर्घ सेवापथाचा, एका कर्तव्यनिष्ठ आयुष्याच्या यशस्वी पूर्णत्वाचा आहे.

श्री. गोलाईत यांनी पोलीस खात्यात ‘पोलीस हवालदार (वाहनचालक)’ या पदावर २९ वर्षे सेवा केली. नोकरीची सुरुवात त्यांनी मुंबई पोलीस दलात केली आणि त्यानंतर मालेगाव या संवेदनशील शहरात मा.अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाहनचालक म्हणून कार्यरत राहिले.

ही नोकरी केवळ वाहन चालवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची, वेळेवर, सुरक्षित आणि काटेकोर सेवा देण्याची, सतत दक्ष राहण्याची आणि प्रसंगी जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेण्याची.

त्यांच्या संपूर्ण सेवा काळात एक ही अनुचित प्रसंग किंवा अपघात न घडणे, ही बाब त्यांच्या कौशल्याची, शिस्तीची आणि कार्यक्षमतेची स्पष्ट साक्ष आहे.

वाहनचालक या पदाकडे अनेकदा गौण दृष्टीने पाहिले जाते, परंतु पोलीस खात्यासारख्या अत्यंत जबाबदारीच्या यंत्रणेत हा एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. हा दुवा कुठला ही आवाज न करता, कुठला ही गाजावाजा न करता, फक्त कर्तव्यनिष्ठेने आणि संयमाने काम करत असतो.

मालेगावसारख्या संवेदनशील शहरात सेवा देताना त्यांनी विविध IPS अधिकाऱ्यां बरोबर काम केले. कोणता ही अधिकारी आपल्या आजूबाजूला शांत, समजूतदार, संयमी आणि निष्ठावान सहकाऱ्याला प्राधान्य देतो आणि श्री.गोलाईत हे अशाच विश्वासार्ह आणि गुणवान सहकाऱ्यांचे उत्तम उदाहरण आहेत.

सेवा ही केवळ वर्षांची गणना नसते, ती असते.
आठवणींची, अनुभवांची आणि मिळालेल्या विश्वासाची.

आदरणीय गोलाईतांनी आपली ही सेवा अत्यंत शिस्तबद्ध, संयमित आणि समर्पित वृत्तीने पार पाडली. त्यांनी जो कार्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला, तो आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

आज ते निवृत्त होत आहेत, परंतु त्यांच्या कामाची छाया अजून ही अनेकांच्या मनात ठसठशीतपणे उमटत राहील. ज्या गाडीतून अनेक अधिकारी वेळेवर पोहोचले, त्या गाडीत बसलेला चालक मात्र नेहमी वेळे पेक्षा पुढेच असायचा सतर्क, सजग आणि सुसंस्कृत.

कधी कधी एखादी व्यक्ती मोठ्या पदावर जाऊन मोठी होत नाही, तर स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत करत ती व्यक्ती मोठेपणा प्राप्त करते आणि श्री. गोलाईत हे याचेच ज्वलंत उदाहरण आहेत.

आज त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आमच्या हृदयातून केवळ शुभेच्छाच नव्हे, तर एक कृतज्ञतेचा ऋणनिर्देश ही निघतो आहे.

आदरणीय श्री. गोलाईत ,आपल्या पुढील आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो, हीच आमची प्रार्थना.

कारण सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही, तर एका नव्या प्रवासाची सुंदर सुरुवात असते आणि ती सुरुवात तुमच्यासारख्या संयमी, शिस्तबद्ध आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाने अधिक अर्थपूर्ण ठरावी, अशीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे.

तुमच्या सेवेला मनापासून सलाम... आणि पुढील प्रवासासाठी अनंत शुभेच्छा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !