साधेपणातून घडलेली असामान्य व्यक्तीमत्व – प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी (नाना कुलकर्णी)
साधेपणातून घडलेली असामान्य व्यक्तीमत्व – प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी (नाना कुलकर्णी)
सामान्य माणसाचं आयुष्यही असामान्य कसं असू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी यांचं जीवन. शहादा तालुक्यातील वैजाली या छोट्याशा गावात एका अत्यंत साध्या, कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेतीसह भिक्षुकी करून संसार चालवत होते. घरात आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. भाजीऐवजी लोणचं, दिव्याऐवजी कंदील, आणि खेळण्यांच्या जागी मातीची खेळणी – अशा परिस्थितीतच त्यांचे बालपण गेले.
लहानपणापासूनच त्यांनी आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले. घरात दोन वेळेचं जेवण मिळणंही कठीण होतं. पण एक गोष्ट त्यांनी मनाशी घट्ट ठरवली – "शिक्षणाशिवाय प्रगती नाही!" त्यामुळे घरच्या कामांमध्ये मदत करत, स्वतः मेहनत करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शाळेची फी, वह्या-पुस्तकं, गणवेश – सगळं त्यांनी स्वतःच्या कष्टातून मिळवलं.
घरात कोणीही नोकरीत नव्हतं, पण त्यांनी पंचायत समिती एरंडोल येथे इ. स. न. 1977 मध्ये रोजंदारी वर नोकरीची सुरूवात केली, ही नोकरी त्यांच्यासाठी केवळ उदरनिर्वाहाचं साधन नव्हती, तर आयुष्याच्या वाटचालीतील महत्त्वाची पायरी होती. इथूनच त्यांच्या यशाचा खरा प्रवास सुरू झाला.
प्रभाकरजी (नाना ) अत्यंत साधे, सच्चे आणि माणुसकीने भरलेले व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांनी केवळ आपल्या कुटुंबापुरतेच योगदान दिलं नाही, तर आपल्या भावाचा मुलगा आणि मित्राचा मुलगा यांना एरंडोल येथे शिक्षणासाठी ठेवून त्यांना आधार दिला. आज या मुलांचे जीवन घडण्यात प्रभाकरजींचा मोलाचा वाटा आहे.
त्यांच्या सेवाभावी आणि माणुसकीच्या वृत्तीचं अजून एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे – त्यांची कॅन्सरग्रस्त काकू. तब्बल १८ वर्षं त्यांनी त्या काकूला आपल्या घरी ठेवलं, त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली, सेवा केली आणि शेवटी अंतिम संस्कारही स्वतः केले. इतकंच नाही तर त्या काकूंच्या दोन्ही मुलांचे विवाहही आपल्या मुलांप्रमाणे पार पाडले. हे फक्त नातं नाही, ही माणुसकीची मूर्तिमंत उदाहरण आहे.
५८ व्या वर्षी ते जि. प. बांधकाम उपविभाग एरंडोल येथे कनिष्ठ सहाय्यक पदावरून सेवानिवृत्त झाले. पण त्यांनी निर्माण केलेल्या संस्कारांची आणि मूल्यांची शिडी पुढील पिढीत वाहत आहे.
आज त्यांचे चिरंजीव प्रसाद कुलकर्णी हे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत स्थापत्य अभियंता सहाय्य्क म्हणून नंदुरबार येथे कार्यरत आहेत. वडिलांनी दिलेल्या मूल्यांचं, कष्टांचं, आणि माणुसकीच्या संस्कारांचं ते आजही जतन करत आहेत.
प्रभाकर कुलकर्णी यांचं आयुष्य म्हणजे , संपत्ती नसतानाही मनाचं मोठेपण, आणि प्रसिद्धी नसतानाही लोकांच्या मनात घर करणारा एक दीपस्तंभ आहे.
आजच्या यंत्रयुगात अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत – जे झगमगाट न करता, माणुसकीच्या प्रकाशात आपली वाट चालतात आणि इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा