"शिक्षणाचा दीप आणि साधेपणाचा संग – बाळासाहेब मैराळ यांची अमर आठवण"


"शिक्षणाचा दीप आणि साधेपणाचा संग – बाळासाहेब मैराळ यांची अमर आठवण"


एरंडोलच्या पवित्र भूमीत जन्मलेलं एक तेजस्वी सुसंस्कृत आणि सुसंवादशील व्यक्तिमत्त्व आज आपल्या आठवणींतून आपल्याशी संवाद साधत आहे.स्वर्गस्थ प्रकाश जयकृष्ण मैराळ, ज्यांना सर्वत्र लोक “बाळासाहेब” या प्रेमळ आणि आदरयुक्त नावाने त्यांना ओळखत. आज त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा मागोवा घेताना, डोळ्यांत अश्रू अनावर होतात.

त्यांचा जन्म एका साध्या पण मूल्यांनी परिपूर्ण अशा कुटुंबात झाला. वडील शेती करत असतानाच गावातील केशव मंदिरात पूजा-अर्चा करून ईशसेवेत स्वतःला अर्पण करत. आई-वडिलांच्या कष्टमय जीवनशैलीचा आणि साधेपणाचा प्रभाव त्यांच्या बालमनावर खोलवर बसला. त्या वातावरणात वाढत असताना, बाळासाहेबांनी लहान वयातच जाणले की, परिस्थिती बदलण्याचे एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण.

त्या काळात शिक्षण घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. आर्थिक अडचणी, घरगुती जबाबदाऱ्या आणि आपल्या स्वप्नांशी सतत चालणारी तडजोड — या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. दिवसभर वडिलांना शेतात मदत, मंदिरातील सेवा-सांभाळत, आणि रात्री उशिरा अभ्यास — हाच त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्यातील अथक मेहनत, निष्ठा आणि जिद्दीचं फलित म्हणजे त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळकोठा येथे शिक्षक पद मिळणं.

परंतु ही नोकरी त्यांच्यासाठी केवळ उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं — ती त्यांच्या आयुष्याची एक साधना होती. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान दिलं नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात माणूस घडवण्याचा संस्कार ही रुजवले. त्यांचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक कृती विद्यार्थ्यांसाठी एक शिकवण बनून राहायची.

त्यांच्या साधेपणा, सौम्य स्वभाव, आणि निःस्वार्थ कार्यनिष्ठेमुळे त्यांना शिक्षक समाजात विशेष मान आणि प्रतिष्ठा लाभली. कालांतराने ते मुख्याध्यापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली, परंतु पद बदललं तरी त्यांचं साधं, नम्र आणि माणुसकीनं भरलेलं व्यक्तिमत्त्व जसंच्या तसं कायम राहिलं.

ते एक अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवला. केवळ
अभ्यासापुरतंच नव्हे, तर आयुष्यभर उपयोगी ठरतील असे संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा ही केवळ शिक्षणाचं केंद्र न राहता, एक संस्कार केंद्र बनली.

आपल्या वडिलांच्या कष्टाचं चीज करत त्यांनी स्वतःच्या संस्कारांतून समाज घडवण्याचं काम केलं. हेच त्यांच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं यश होय.

आज त्यांचे चिरंजीव श्रीपाद मैराळ वडिलांच्या आदर्श पावलावर पाऊल ठेवत जीवन जगत आहेत. त्यांच्या घरात अजूनही तीच मूल्यव्यवस्था, तोच साधेपणा, आणि तीच माणुसकीची ओळख जपली जाते. संपत्ती नव्हे, तर संस्कार हेच खरे वारसाहक्क असतो, हे त्यांच्या जीवनातून सहज उमगते.

आज त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणदिनी, त्यांना केवळ एक शिक्षक म्हणून नव्हे, तर एक युगद्रष्टा शिक्षक, आदर्श पिता, आणि सच्चा माणूस म्हणून स्मरण करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे.

स्व. बाळासाहेब मैराळ यांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक शांत, सात्विक आणि प्रवाही गंगा – जी आपल्या मार्गावर फुलंही सोडते आणि संस्कारही.

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !