शून्यातून विश्व निर्माण करणारे ‘अण्णा’ – एका थोर शिक्षकाची जीवनगाथा


शून्यातून विश्व निर्माण करणारे ‘अण्णा’ – एका थोर शिक्षकाची जीवनगाथा

धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द या लहानशा गावात एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म झाला एका असामान्य व्यक्तीचा – दयाराम सिताराम पाटील फुलमाळी यांचा, ज्यांना आज सर्वजण प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून ओळखतात. त्यांच्या वडिलांचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त सालदारकी होते. घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची होती, पण या प्रतिकूल परिस्थितीत ही अण्णांनी आपले जीवन घडवले.

इतरांसाठी बालपण म्हणजे खेळ, मस्ती, आणि निरागस हसू असते. मात्र अण्णांसाठी बालपण होते कठोर वास्तवाचे दर्शन आणि कष्टमय वाटचाल. लहान वयातच त्यांनी घरातल्या गरिबीचे, आई-वडिलांच्या कष्टांचे गांभीर्य ओळखले. आणि तेव्हाच मनोमन ठरवले – “आपले आयुष्य बदलायचे असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे.”

शिक्षणासाठी कोणती ही मदत नसताना त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि चिकाटीवर विश्वास ठेवला. मिळेल ते काम करून, उन्हातान्हात कष्ट सहन करत त्यांनी शिक्षणाची वाट चालू ठेवली. शिक्षण ही त्यांच्यासाठी केवळ पदवी नव्हती, तर ती होती स्वतःच्या आयुष्याला आकार देणारी ऊर्जा.

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि ते महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक म्हणून ते अत्यंत विद्यार्थी प्रिय होते. शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण असताना ही ते विद्यार्थ्यांशी अतिशय प्रेमाने, आपुलकीने आणि समजूतदारपणाने संवाद साधत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतर्मना पर्यंत पोहोचणारा शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

त्यांच्या कार्यकुशलतेचा, नेतृत्वगुणांचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून त्यांची पदोन्नती झाली आणि ते धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक पदावर रुजू झाले. पुढे पुन्हा एरंडोल येथे परत येत, त्यांनी त्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली.

मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला. दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांची आखणी – हे सर्व त्यांच्या नेतृत्वात शक्य झाले. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, मदतीचा हात पुढे केला आणि अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेड पसरवला.

आज ही, वयाच्या ८० व्या वर्षी, अण्णा आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना तितक्याच आपुलकीने भेटतात. त्यांचे बोलणे, साधेपणा आणि मनमोकळेपणाने संवाद साधण्याची शैली आजही लोकांच्या मनाला भावते. त्यांची आठवण आज ही अनेकांचे डोळे पाणावते.

खरंच,"शून्यातून विश्व निर्माण करणं" म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णा – दयाराम सिताराम पाटील (फुलमाळी). त्यांनी केवळ स्वतःचं जीवन उभं केलं नाही, तर अनेक विद्यार्थ्यांना दिशा दिली, त्यांचं जीवन घडवलं. त्यांच्या शिकवणीतून जन्मलेली माणुसकी, संस्कार, आणि प्रेरणा – हेच त्यांचं खरं वैभव आहे.

अण्णा, तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत नसतात, तर आज अनेकांचे आयुष्य अपूर्ण आणि दिशाहीन राहिले असते.
तुमच्या अथक परिश्रमांना, त्यागमय जीवनाला आणि प्रेमळ मार्गदर्शनाला आमचा शतशः नम्र अभिवादन!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !