शालिग्राम अर्जुन गायकवाड : समाजासाठी समर्पित एक हृदयस्पर्शी प्रवास
शालिग्राम अर्जुन गायकवाड : समाजासाठी समर्पित एक हृदयस्पर्शी प्रवास
एरंडोल (जि. जळगाव) येथील एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शालिग्राम अर्जुन गायकवाड हे नाव आज एरंडोल तालुक्यात आदराने घेतले जाते. त्यांचे वडील न्यायालयात नोकरी करत होते. घरची परिस्थिती तशी सामान्य, पण प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी आणि माणुसकीची जाण याचा वारसा त्यांना लाभलेला होता.
बालपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांचे कष्ट पाहिले होते. त्यामुळेच त्यांच्या मनात एक गोष्ट ठामपणे रुजली होती—"घराची प्रगती आणि समाजात काही तरी करून दाखवायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही." ही जाणीव त्यांनी मनाशी घट्ट धरली आणि शिक्षणाच्या वाटेवर न थांबता वाटचाल केली.
शिक्षणा सोबतच त्यांना सामाजिक कार्याची ही प्रचंड आवड होती. शालेय जीवनात असतानाच ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेत. त्यांच्या आजूबाजूला नेहमी मित्रांचा मोठा गोतावळा असे, कारण ते प्रत्येकाच्या अडचणीत खंबीरपणे साथ देणारे होते.
त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ ३०व्या वर्षी ते एरंडोल नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ही निवड ही त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि समाजातील सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या विचारांवर टाकलेल्या विश्वासाची पावती होती.
त्यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी पुतळा, तसेच महात्मा फुलेंच्या कार्याची आठवण करून देणारा स्मारक साकार झाले. ही फक्त स्मारके नव्हती, तर समाजाला नव्या विचारांची दिशा देणारे दीपस्तंभ होते.
तेव्हा लोक त्यांना प्रेमाने आणि आदराने "भाऊ" म्हणू लागले. कारण त्यांनी कधीही पदाचा गर्व केला नाही, उलट प्रत्येक माणसाशी आपुलकीने वागले. गावातील कुणाचेही दु:ख असो, मदतीची गरज असो, सरकारी कामामध्ये अडथळा असो—भाऊ नेहमी पुढे उभे राहत.
सामाजिक कार्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वतःची नोकरीचा राजीनामा देऊन सोडली. हा निर्णय आर्थिकदृष्ट्या कठीण होता, पण समाजसेवा हा जीवनाचा उद्देश मानणाऱ्या व्यक्तीला त्याचं मोल ठाऊक होतं. "माणसांच्या मनात घर करायचं असेल, तर त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभं राहावं लागतं," ही त्यांची कार्यशैली होती.
यानंतर त्यांनी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची धुरा सांभाळली. या पदावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य करताना अनेक ठोस आणि जनहिताचे निर्णय घेतले. शेतमालाच्या योग्य किमती, बाजार व्यवस्थापन, वायदा बाजाराचे नियमन अशा बाबींमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. ते प्रशासनापुढे शेतकऱ्यांचा आवाज बनले.
आजही एरंडोलमध्ये एखाद्या चौकात ‘भाऊ’ दिसले, की लोक नुसता नमस्कार करत नाहीत, तर आपली आशा, आपला विश्वास त्यांच्या डोळ्यांत शोधतात. कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व हे राजकीय नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलतेने भरलेले आहे. ते नेते नाहीत, तर जनतेचे खरे प्रतिनिधी आहेत.
शालिग्राम गायकवाड हे नाव म्हणजे सामाजिक समर्पणाचा मूर्तिमंत आदर्श आहे. त्यांनी हे सतत सिद्ध केलं की, "सामाजिक कार्य ही श्रीमंती नव्हे, ती मनाची उधळण असते." त्यांचे आयुष्य हेच आजच्या तरुण पिढीसाठी एक जिवंत प्रेरणा आहे—सामान्य घरात जन्मून असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे.
हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी असा त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकाला सांगतो—"कार्य पदावरून मोठं होत नाही, तर मनाच्या विशालतेतून आणि समाजासाठीच्या प्रेमातून ते मोठं होतं."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा