पंडित माधवराव साळी : शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा दीपस्तंभ
पंडित माधवराव साळी : शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा दीपस्तंभ
शिक्षक म्हणजे केवळ वर्गात धडे देणारा नसतो... तो आयुष्याचे खरे धडे शिकवतो. तो ज्ञान देतो, संस्कार रुजवतो, विचारांची दिशा देतो आणि मन घडवतो. अशा शिक्षकांचे अस्तित्व समाजासाठी भाग्याचं असतं. पंडित माधवराव साळी हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व संयम, संघर्ष, समर्पण आणि सेवाभाव यांचं मूर्तिमंत प्रतीक.
त्यांचा जन्म एरंडोल या छोट्याशा गावात एका साध्या, परंतु कष्टकरी विणकर कुटुंबात झाला. घरात आर्थिक सुबत्ता नव्हती, पण त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्नं होती. लहान वयातच त्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले. आणि तेव्हाच त्यांच्या मनात एक निश्चय पक्का झाला "या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे!"
अन् मग सुरू झाला एक अविरत प्रवास… घरकाम, शिक्षकांच्या घरी पाणी भरणं, आणि त्याच वेळी अभ्यास. लहानपणापासूनच त्यांना शिक्षक होण्याची तीव्र इच्छा होती. त्यांच्या ओठांवर नेहमी एकच वाक्य असायचं "एक शिक्षक, एक संपूर्ण पिढी घडवू शकतो!"
त्यांची डी.एड. प्रशिक्षणासाठी जळगाव येथे मेरिटवर निवड झाली. पैशांची टंचाई असतानाही आजोबांनी मदतीचा हात दिला आणि त्या संधीचं सोनं करत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाने डी.एड. परीक्षेत यश मिळवलं.
त्यांची पहिली नियुक्ती वाघळे या गावात झाली. विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने वागून त्यांनी त्या मुलांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवली. पुढे ते एरंडोल कन्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि ती शाळा एक आदर्श शिक्षणसंस्था बनली.
तसेच, सलग आठ वर्षे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात स्वीय सहाय्यक शिक्षक (PA) म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम पाहिलं. त्यांच्या प्रामाणिकतेसाठी १९९० मध्ये 'आदर्श शिक्षक पुरस्कार' आणि १९९१ मध्ये राष्ट्रपतींकडून जनगणना कार्यासाठी 'कास्य पदक' बहाल करण्यात आलं.
त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांना पाच वेळा अतिरिक्त वेतनवाढी (incentive increments) मिळाल्या हे त्यांच्या कार्यक्षमतेचे वेगळेच प्रमाण आहे.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांचं कार्य अखंड सुरूच आहे. निवृत्त सेवा संघाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष व ट्रस्टी, तसेच साळी समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.
ते "जागतिक साळी फाउंडेशन"चे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या "जीव्हेश्वर समाचार" मासिकाचे ट्रस्टी व कार्यकारिणी सदस्य, तसेच मुंबई येथील "स्वकुळ समाचार" मासिकाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी आपल्या सामाजिक सहभागाचा ठसा उमटवला आहे.
सामाजिक कार्याचा एक वेगळा आयाम म्हणजे साळी समाजाच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दिला जाणारा आर्थिक आधार. अध्यक्ष या नात्याने ते दरवर्षी
इयत्ता 1वी ते 5वी – 5000 रु.
6वी ते 12वी – 7000 रु.
12वी नंतर पदवीपर्यंत – 10000 रु. अशा स्वरूपात सुमारे 11 विद्यार्थ्यांना चेकद्वारे शैक्षणिक मदत देतात.
त्यांच्या जीवनातील सर्वात मोठं यश म्हणजे त्यांची पुढची पिढी त्यांच्या पावलावर चालत आहे. त्यांचे दोन्ही पुत्र शिक्षक असून, सुनबाई देखील शिक्षिका आहे. हे त्यांच्या संस्कारांचं ठळक प्रतिबिंब आहे.
पंडित माधवराव साळी हे केवळ एक नाव नाही, तर संस्कार, शिक्षण आणि सामाजिक जागृतीची प्रेरणागाथा आहे. त्यांचं जीवन म्हणजे एक दीपस्तंभ ज्याच्या प्रकाशात कितीतरी आयुष्य उजळली.
"शब्द संपतात, पण आदराची भावना कधीच संपत नाही…"
त्यांच्या कार्याला आणि जीवनमूल्यांना मन:पूर्वक सलाम!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा