"सायकलवरून माणुसकीची वाट चालणारा हिरा- भागचंद भगा चौधरी"

"सायकलवरून माणुसकीची वाट चालणारा हिरा- भागचंद भगा चौधरी"


श्री. भागचंद भगा चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंबळगाव या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील श्री. भगा विष्णू चौधरी हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाच भागचंद चौधरी केवळ दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी पुढे येऊन घराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, गावात रोजगाराच्या संधी अभावाने संपूर्ण कुटुंबाने मिळेल त्या कामाच्या शोधात धुळे शहरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

धुळे येथे आल्यावर त्यांचे मोठे बंधू मंगा चौधरी व रामदास चौधरी यांनी हमालीचे काम स्वीकारले. अत्यंत मेहनती, संयमी आणि समर्पित स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याने लोकांची मने जिंकली. त्यांच्या भावाची नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांची "हमारी मापाडी संघटनेचे अध्यक्ष" म्हणून निवड झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, संघटन कौशल्य आणि माणुसकीची पावती होती.

त्यांच्या कुटुंबात एकूण सहा भाऊ आणि दोन बहिणी होत्या. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक भावांनी शिक्षण अर्धवट सोडून मजुरीचा मार्ग पत्करला. अशा पार्श्वभूमीत असून ही भागचंद चौधरी यांनी धुळे येथे सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचा प्रचंड छंद होता.

पुढे त्यांनी पोलीस भरतीत सहभाग घेतला आणि काही काळ पोलीस खात्यात कार्यरत राहिले. मात्र, पोलीस खात्यातील वातावरण त्यांच्या स्वभावास अनुरूप वाटले नाही. म्हणून त्यांनी कोणता ही द्विधा न बाळगता राजीनामा दिला. नोकरी सोडल्यानंतर मित्रांच्या प्रेरणेमुळे त्यांना गिरणा पाटबंधारे विभागात पाटकरी या पदावर नोकरी मिळाली.

या नोकरीच्या माध्यमातून त्यांची बदली धरणगाव येथे झाली. तेथेच त्यांचे विवाह जमले. विवाहानंतर काही काळातच त्यांची बदली एरंडोल तालुक्यात झाली. त्याकाळी त्यांच्या कडे कोणते ही खासगी वाहन नव्हते, पण त्यांनी कधी ही परिस्थितीचा गवगवा केला नाही. सायकल हेच त्यांचे मुख्य वाहन होते. त्यांनी सायकलवरून धुळे, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव अशा अनेक तालुक्यांमध्ये नियमितपणे प्रवास करत नोकरी केली.

त्यांनी कधीही न थकता, न थांबता आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांच्या कठोर श्रम, निष्ठा आणि सचोटीच्या बळावर त्यांनी पाटबंधारे विभागात "कॅनल इन्स्पेक्टर" या जबाबदारीच्या पदावर काम केले. शेतकऱ्यां पर्यंत पाणी वेळेवर पोहोचावे, यासाठी त्यांनी सतत सायकलवरून प्रवास करत आपली सेवा दिली.

पाच मुले आणि दोन मुली अशा मोठ्या कुटुंबाचा त्यांनी प्रामाणिकपणे, सच्च्या मनाने आणि जबाबदारीने संसार उभारला. जीवनभर त्यांनी सायकलची साथ न सोडता, कधी ही थाटामाटाचा आधार न घेता, साधेपणात ही मोठेपणा जपला.

भागचंद चौधरी हे अत्यंत साधे, सच्चे आणि माणुसकीने ओथंबलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कधीच कोणत्या ही पदाचा, अधिकाराचा गर्व नव्हता. ते नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालत. कोणाच्या ही अडचणीला, दुःखाला त्यांनी कधीही पाठ फिरवली नाही. प्रत्येकाला आपलेपणाने वागवणं हाच त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता.

आज त्यांची मुले ही त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेत आहेत. सुपुत्र श्री. हेमंत चौधरी हे शिवसेनेचे तालुका संघटक म्हणून सक्रिय असून, त्यांच्या पत्नी भारती चौधरी या शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख म्हणून समाजकार्य करत आहेत. भागचंद चौधरी यांनी दिलेल्या माणुसकीच्या, कष्टाच्या आणि साधेपणाच्या शिकवणीचा प्रभाव त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक वागण्यात दिसून येतो.

श्री. भागचंद भगा चौधरी यांचं संपूर्ण जीवन म्हणजे
साधेपणातही मोठेपणा, संघर्षांतून यश आणि माणुसकीतून समाजशीलतेचा वसा.
ते केवळ सायकल वरून प्रवास करणारे नव्हते, तर माणुसकीच्या वाटेवर चालणारे एक खरेखुरे माणूस होते.

त्यांच्या जीवनाने आपल्याला शिकवण दिली की 
"माणूस मोठा पदाने नाही होत, तर त्याच्या कृतीने, विचारांनी आणि जगण्याच्या पद्धतीने मोठा होतो!"

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !