आई-वडिलांची शिदोरी – आयुष्याची खरी समृद्धी


आई-वडिलांची शिदोरी – आयुष्याची खरी समृद्धी

वडिलांचे कष्ट आणि आईचे संस्कार हीच दोन अत्यंत शक्तिशाली मूर्ती आहेत, ज्या प्रत्येक माणसाचे आयुष्य घडवतात. कोणत्या ही व्यक्तीच्या आयुष्याचा पाया जर मजबूत असेल, तर त्यामागे असतो वडिलांचा घाम आणि आईच्या अंतःकरणातून मिळालेला स्नेह, माया आणि उदात्त शिकवण.

वडील हे आपल्या आयुष्याचे आधारस्तंभ असतात. ते कधी ही थकत नाहीत, माघार घेत नाहीत. किती ही कठीण प्रसंग आले तरी, स्वतःचं दुःख मनात दडवून, आपल्या उज्ज्वल भविष्याची चिंता करतात. त्यांच्या डोळ्यांत अनेक अपूर्ण स्वप्नं दडलेली असतात, पण त्यांची असफलता किंवा वेदना ते आपल्या चेहऱ्यावर कधी ही उमटू देत नाहीत. त्यांच्या जगण्याचा एकमेव ध्यास आपली मुलं आपल्यापेक्षा अधिक सुखी आणि यशस्वी व्हावीत.

आई ही केवळ स्त्री नसून, ती संपूर्ण घराचा आत्मा असते. तिच्या गोष्टींमधून, तिच्या वागणुकीतून आणि उपदेशांतून आपल्याला जीवनाचे खरे मूल्य समजते. आई आपल्याला स्वाभिमान, प्रामाणिकपणा, नम्रता आणि माणुसकी यांचे बाळकडू देते. लहानपणी रात्री झोपताना तिने सांगितलेल्या गोष्टी, तिने वाढलेले प्रेमाचे घास, तिच्या मिठीतून मिळणारे आधाराचे बळ हे सगळं आपल्या आयुष्याचा आत्मा बनून जातं.

वडिलांच्या हातावर उठलेली जखम म्हणजे आपल्या सुखाच्या घरट्याचा पाया असतो आणि आईच्या पदराला लागलेले अश्रू म्हणजे आपल्या मनात खोलवर रुजलेली माणुसकी असते. या दोघांच्या मिळून घडवलेल्या आयुष्याच्या दागिन्याची किंमत कोणत्या ही सोन्या-चांदीपेक्षा अधिक असते.

आज आपण जे काही आहोत, ते त्यांच्या अज्ञात तपश्चर्येचा आणि निःस्वार्थ त्यागाचा परिणाम आहे. त्यांनी न बोलता जे काही दिलं, त्याची परतफेड कधीही शक्य नाही.

म्हणूनच, जीवनात कितीही यश मिळालं, किती ही उंची गाठली, तरीही सदैव स्मरणात ठेवा.

"वडिलांच्या कष्टांनी आणि आईच्या संस्कारांनीच जीवन सुंदर होतं… आणि त्यांच्या शिवाय कोणती ही उंची पूर्णत्वाला जाऊ शकत नाही."

त्यांच्या ऋणात जगणं हेच खरे यश, आणि तेच आपलं खरे जीवनसौंदर्य आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !