"शिस्तीतली माया – पोलिसातील माणूस"


"शिस्तीतली माया – पोलिसातील माणूस"


काही माणसं अशी असतात, जी फक्त वर्दीत दिसत नाहीत, तर वर्दीच्या मागचं माणूसपण ही जगतात. त्यांचा कठोरपणा हा कायद्याच्या रक्षणासाठी असतो, पण मन मात्र लोण्यासारखं कोमल आणि हळवं असतं. अशाच एका संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि माणुसकीनं परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार श्री. लालसिंग उदयसिंग पाटील.

पिंप्राळा या छोट्याशा खेड्यात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांनी शेतीच्या कष्टातून संसाराचा गाडा ओढला. परिस्थिती सामान्य होती, पण मनात मोठी स्वप्नं होती. लहानपणापासूनच आई-वडिलांचे कष्ट पाहून त्यांना उमजलं “घराची परिस्थिती बदलायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.”

शाळेत नियमितपणे जाणं, अभ्यास करणं आणि त्याच वेळी शेतात कष्ट करणं या सगळ्यात त्यांनी योग्य समतोल राखला. उन्हातान्हात, पावसात ही शिक्षणाचं ध्येय डगमगू दिलं नाही. शिक्षणासोबतच त्यांच्या मनात एक ध्येय रुजलं होतं.“पोलीस व्हायचं.”
वर्दी घालून लोकांची सेवा करायची, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं, आणि समाजाला सुरक्षित ठेवायचं ही त्यांची लहानपणाची जिद्द शेवटी प्रत्यक्षात उतरली आणि ते पोलीस सेवेत दाखल झाले.

पोलीस खात्यात काम करताना त्यांनी वर्दीचा उपयोग केवळ अधिकारासाठी केला नाही, तर सेवेचं माध्यम म्हणून केला. कठोर कायदा हाताळता नाही माणुसकीचा धागा कधीच सुटू दिला नाही. ते होते साधे, सच्चे, संयमी आणि सर्वांना आपलेसे वाटावेत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामागे होतं शांत पण प्रभावी नेतृत्व.

सेवानिवृत्ती नंतर त्यांनी पुन्हा शेतीकडे वाटचाल केली. आज ते प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे गाईंप्रती असलेलं त्यांचं प्रेम हे विलक्षण आहे. गोसेवा हे त्यांच्या जीवनाचं एक श्रद्धास्थानच बनलं आहे. त्यांच्या डोळ्यांत आज ही गाईंच्या सेवेतील समाधानाचं तेज पाहायला मिळतं.

त्यांच्या कुटुंबाची ही हीच संस्कृती पुढे गेली आहे. त्यांचे दोन पुत्र एक जिल्हा पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत, तर दुसरे एम.टेक. व पीएच.डी. शिक्षण घेऊन जळगाव येथील देवकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वडिलांकडून मिळालेली प्रामाणिकपणा, कष्ट, निष्ठा आणि माणुसकी यांची शिदोरी त्यांनी मनापासून स्वीकारली आहे.

“ते एक पोलिसातील माणूस आहेत…”
कारण त्यांनी वर्दीला केवळ अधिकाराची नाही, तर माणुसकीची ओळख दिली. त्यांच्या डोळ्यांत दडलेली जबाबदारी, त्यांच्या वागण्यातली शिस्त, आणि त्यांच्या मनातली संवेदनशीलता हेच त्यांच्या आयुष्याचं खरं वैभव ठरलं आहे.

लालसिंग पाटील यांचं संपूर्ण जीवन म्हणजे वर्दीतील माणुसकीची एक जिवंत कहाणी.

आज ते त्यांच्या ९० वर्षीय आई, पत्नी, दोन मुलं, दोन सुना आणि तीन नातवंडांसोबत एकत्र कुटुंबपद्धतीत समाधानी जीवन जगत आहेत. कुटुंबातले प्रत्येक सदस्य हे त्यांच्याच संस्कारांची शिदोरी घेऊन समाजात आपली वेगळी छाप पाडत आहेत.

अशा या प्रेरणादायी, कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकीचा झरा वाहणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक सलाम!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !