गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य !
गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य !
ती फक्त एक मुलगी होती जिवंत, हसरी, मनापासून स्वप्नं जपणारी, आयुष्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणारी. NEET परीक्षेच्या सराव चाचणीत तिचे अपेक्षे प्रमाणे गुण आले नाहीत... इतकंच. ती नापास झाली नव्हती, तिने हार मानलेली नव्हती, ती अजून ही प्रयत्नशील होती. पण तिचा वडील एक शिक्षक, एक मुख्याध्यापक जो इतर विद्यार्थ्यांना अपयशातून मार्ग दाखवतो, त्याच्याच घरात त्याने आपल्या स्वतःच्या लेकीला समजून न घेता अमानुष शिक्षा केली. ती शिक्षा इतकी क्रूर आणि असह्य होती की, तिचा शेवट तिच्या जीवनावर झाला.
आज ही मन सुन्न होतं, अंगावर काटा येतो. एका निष्पाप मुलीने केवळ काही गुण कमी मिळाल्यामुळे प्राण गमावावा, ही केवळ एका कुटुंबातील शोकांतिका नाही; ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील, समाजातील आणि पालकत्वातील चुकीच्या समजुतींची भीषण परिणती आहे. जेव्हा आपण यश म्हणजे केवळ गुण, टक्केवारी आणि वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी प्रवेश मानतो, तेव्हा आपण आपल्या मुलांचं बालपण, त्यांची स्वप्नं, आणि त्यांचं आयुष्य हळूहळू हरवत जातो.
त्या वडिलांनी एक क्षण विचार केला असता, की ज्या शाळेत ते मुख्याध्यापक आहेत, त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी नेहमीच ९०–९५ टक्के गुण मिळवले आहेत का? ज्या विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळवले, त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याची शक्यता संपली का? नाही ना? कारण यश मोजण्याचं एकमेव परिमाण गुण असूच शकत नाही. एखादा मुलगा कमी गुण मिळवून ही एक प्रेरणादायक शिक्षक होतो, एखादी मुलगी नापास होऊन ही उद्योजिका बनते. कारण आयुष्याच्या परीक्षेला उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास, चिकाटी, आणि धैर्याची आवश्यकता असते गुणांची नव्हे.
कमी गुण मिळणं म्हणजे अपयश नव्हे. अपयश ही शिक्षण प्रक्रियेतील एक पायरी आहे, जी ओलांडूनच पुढे जाता येतं. पण ही पायरीच जर इतकी जड आणि कठीण झाली की ती थेट एखाद्याच्या प्राणावर बेतते, तर त्यासाठी जबाबदार कोण? फक्त ती मुलगी? की तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न? की तिच्यावर लादलेल्या अती अपेक्षा?
खरंतर शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. समजून घेण्याची, चुका करून शिकण्याची, आणि पुन्हा उभं राहण्याची. शिक्षक हा असा असावा, जो विद्यार्थ्याच्या अपयशात ही त्याच्या पाठीशी उभा राहतो. पण जेव्हा तोच शिक्षक एका वडिलांच्या भूमिकेत, आपल्या लेकीवर अपेक्षांचं इतकं मोठं ओझं लादतो की ती कोलमडून जाते, तेव्हा ते केवळ त्या वडिलांचं अपयश नसतं, तर ते संपूर्ण समाजाचं अपयश असतं.
या समाजाने, शिक्षण संस्थांनी आणि विशेषतः पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की गुणांनी माणूस ठरत नाही. माणूस ठरतो त्याच्या विचारांनी, त्याच्या जिद्दीने, आणि माणुसकीच्या संवेदनांनी. आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो, कारण ती आपली आहेत.त्यांनी किती गुण मिळवले म्हणून नव्हे, तर ते किती प्रामाणिकपणे शिकतात, जगतात आणि जीवन घडवतात, यावरून.
त्या मुलीचं चुकलं तरी काय होतं? केवळ एवढंच की ती आपल्या वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही? तिने त्यांना अधिक गुण मिळवून समाधान दिलं नाही? तिला फक्त आधार हवा होता, पण मिळालं केवळ राग आणि कठोरता. आज ती मुलगी जिवंत असती, तर कदाचित पुढच्या वर्षी ती NEET उत्तीर्ण झाली असती, कदाचित तिने नर्सिंग किंवा इतर काही क्षेत्र निवडलं असतं किंवा कदाचित काहीच नाही पण ती एक चांगली माणूस म्हणून जगत राहिली असती.
हे केवळ तिचं नुकसान नव्हतं. तिच्या सोबत एक बाप हरवला, एक शिक्षक हरवला, आणि एक समाज पुन्हा एकदा आपल्या चुकीच्या शिक्षणसंस्कृतीत गुरफटून गेला.
कधी थांबणार आहे हा गुणांचा हव्यास? कधी आपण समजून घेणार की माणूस हे केवळ गुणांचं उत्पादन नाही? कधी उगम होईल अशा शाळेचा, जिथे गुण मिळवणं हे एकमेव उद्दिष्ट नसेल, जिथे अपयश स्वीकारलं जाईल, जिथे प्रत्येक मुलाला माणूस म्हणून स्थान दिलं जाईल?
त्या मुलीचा मृत्यू ही एका बापाच्या अपेक्षांची परिणती नव्हती ती माणुसकीच्या हरवलेल्या श्वासांची तडफड होती. आणि ती तडफड पुन्हा कुणाच्याही आयुष्यात घडू नये, यासाठी वेळ आली आहे. गुणांपेक्षा समजुतीचा विचार करण्याची, आणि माणूस म्हणून माणूस वागवण्याची.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा