कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन
कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन
काही माणसं शांत असतात, पण त्यांचं कार्य मात्र मोठ्यानं बोलतं. ना कधी स्वतःची जाहिरात, ना आत्मप्रशंसा… तरी ही त्यांच्या निष्ठेने, प्रामाणिकतेने आणि सातत्याने केलेल्या कामातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी ओळख म्हणजे – १३२ के.व्ही. उपकेंद्र शिरपूरचे उपकार्यकारी अभियंता, श्री. नितीन गजानन महाजन.
महापारेषण कंपनीच्या नाशिक येथे पार पडलेल्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्यस्तरीय फील्ड अवॉर्ड २०२४-२५ त्यांना प्रदान करण्यात आली. हा पुरस्कार केवळ एक प्रमाणपत्र नव्हे, तर त्यांच्या अखंड सेवाभावाची, झिजणाऱ्या प्रयत्नांची आणि न थकता केलेल्या कार्याची अधिकृत पावती आहे.
वीजपुरवठ्यासारखी अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची व्यवस्था हाताळणं हे केवळ तांत्रिक ज्ञानाचं काम नसून, ती एक मोठी सामाजिक जबाबदारी ही असते. लाखो घरांमध्ये प्रकाशाची एकसंधता टिकून राहावी, कोणी ही अंधारात अडकू नये, यासाठी कुणीतरी आपला वेळ, श्रम, झोप आणि आयुष्यही या कार्याला समर्पित करतं. नितीन महाजन यांनी हे सगळं कुठला ही गाजावाजा न करता, केवळ कर्तव्य म्हणून पार पाडलं आहे.
शिरपूर येथील उपकेंद्राची जबाबदारी अत्यंत समर्पकपणे सांभाळताना, अनेक तांत्रिक अडचणींना त्यांनी यशस्वीरित्या तोंड दिलं. अनपेक्षित प्रसंगांमध्ये ही त्यांनी अत्यंत संयम राखत निर्णय घेतले आणि सेवा अबाधित ठेवली. म्हणूनच त्यांचं नाव या पुरस्कारासाठी संपूर्णपणे योग्य वाटलं आणि मान्य ही झालं.
आजच्या युगात, जिथे प्रत्येक जण स्वतःचं श्रेय घेण्यासाठी झगडतो आहे, तिथे नितीन महाजन यांच्या सारखी माणसं अजूनही फक्त आपलं काम बोलू देतात. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता, वागणुकीतली नम्रता, आणि सहकाऱ्यांशी वाटलेली आपुलकी यामुळे ते केवळ एक अधिकारी न राहता, विश्वासाचा आणि आदराचा आधारस्तंभ ठरले आहेत.
त्यांचं मूळ गाव – चोपडा/धानोरा. त्या छोट्याशा गावातून आलेली ही माणूसआज राज्यस्तरीय व्यासपीठावर आपल्या कार्याचा ठसा उमटवते आहे. हे यश केवळ त्यांचं वैयक्तिक नसून, त्यांच्या मातीच्या संस्कारांचं आणि कुटुंबाच्या पाठबळाचं ही द्योतक आहे. त्यांच्या यशात गावचा सन्मान आहे, आई-वडिलांच्या प्रार्थनांचं पुण्य आहे आणि त्यांच्या अंगी असलेल्या चिकाटीचं बळ आहे.
आज त्यांच्या नावासोबत ‘स्टेट लेव्हल अवॉर्ड’ ही नवी ओळख जोडली गेली आहे, पण त्यांच्या मनात आज ही ‘कर्तव्य’ हाच खरा धर्म आहे. म्हणूनच त्यांच्या यशात केवळ एक अभियंता दिसत नाही, तर एक सजग, सेवाभावी आणि समाजप्रेमी व्यक्तिमत्त्व ठळकपणे जाणवतं.
श्री. नितीन गजानन महाजन यांना या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या कार्यातून उभा राहिलेला आदर्श, समाजातील प्रत्येक तरुणाला दिशा दाखवणारा ठरावा, हीच अपेक्षा.
तुमचं कार्य असंच उजळत राहो. आज तुमच्यामुळे जसं कितीतरी घरं प्रकाशमान झाली आहेत, तसंच अनेक हृदयंही आज गर्वाने उजळून निघाली आहेत.
मन:पूर्वक अभिनंदन… आणि आभार! 🌹
@ दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा