सेवाभावाचे अढळ प्रतीक – अरुण श्रावण सोनवणे

सेवाभावाचे अढळ प्रतीक – अरुण श्रावण सोनवणे 

जळगाव तालुक्यातील नांद्रा या छोट्याशा गावात एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात अरुण श्रावण सोनवणे यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच जणू कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची ज्योत त्यांच्या अंतर्मनात प्रज्वलित झाली होती. त्यांचे वडील पोलीस खात्यात (एस.आय.) म्हणून कार्यरत होते. घरातील शिस्त, सेवा आणि सच्चाई या मूळ मूल्यांचं बाळकडू त्यांना बालपणीच लाभलं.

बालपणापासून अरुणजींच्या मनात लोकसेवेबद्दल विशेष आकर्षण होतं. विशेषतः आरोग्य क्षेत्रा विषयी त्यांचं आत्मीय नातं निर्माण झालं होतं. लोकांच्या दुःखात सहभागी होणं, गरजूंसाठी काहीतरी करणं, त्यांना आधार देणं हे त्यांच्या स्वभावात खोलवर रुजलेलं होतं. घरची परिस्थिती अत्यंत साधी तरी ही त्यांनी कधी ही त्याचा बाऊ केला नाही. उलट परिस्थितीवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवायचं, ही जिद्द त्यांनी लहान वयातच मनाशी बांधली होती.

शिक्षणाची महत्त्वाची जाणीव त्यांना फार लवकर झाली. "घरात प्रगती घडवायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही," हा दृढ विश्वास त्यांनी मनात कायम ठेवला.कोणते ही विशेष शैक्षणिक पाठबळ, सुविधा किंवा मार्गदर्शन नसताना ही त्यांनी केवळ आपल्या चिकाटीच्या, अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या बळावर शिक्षण पूर्ण केलं. हा टप्पा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा वळणबिंदू ठरला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे कक्ष सेवक या पदावर झाली. ही नोकरी अरुणजींसाठी फक्त पगाराचं साधन नव्हती.
ती समाजाशी जोडलेली एक जबाबदारी होती. त्यांनी हे काम केवळ कर्तव्य म्हणूनच नव्हे, तर आत्मीयतेने, सेवाभावाने आणि अत्यंत निष्ठेने निभावलं.

रुग्णालयात त्यांनी जे योगदान दिलं, ते अमूल्य आहे. प्रत्येक रुग्णाशी त्यांनी आपुलकीचं नातं निर्माण केलं. कोणता ही रुग्ण असो त्याला आधार देणं, मानसिक उभारी देणं, आणि गरज भासल्यास वैयक्तिक मदतीसाठी ही पुढे येणं ही त्यांची स्वाभाविक वृत्ती होती. ते सहकाऱ्यांमध्ये ही तितक्याच प्रेमाने वागत. कोणता ही गर्व न करता, पदाचा अभिमान न बाळगता, त्यांनी एक संयमी, सर्वांना सोबत घेऊन चालणारा सहकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली.

सेवा करताना त्यांचा चेहरा नेहमी शांत, पण मन नेहमी जागरूक असायचं. त्यांनी सेवा ही 'कर्तव्य' म्हणून नव्हे, तर 'धर्म' म्हणून केली. अशा या व्यक्तीच्या सेवानिवृत्तीचा क्षण ही तितकाच भावनिक ठरला. रुग्णालयातल्या भिंतीही आज त्यांच्या आठवणीने ओलावल्या आहेत. अनेक सहकाऱ्यांच्या डोळ्यांतून कौतुकाचे, कृतज्ञतेचे अश्रू वाहिले. कारण हा माणूस केवळ काम करणारा कर्मचारी नव्हता, तो एक जीवनमूल्य जपणारा कार्यकर्ता होता.

आणि विशेष म्हणजे, सेवानिवृत्ती नंतर ही अरुणजींनी आपला सेवाभाव थांबवलेला नाही. आज ही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. जिथे गरज असते, तिथे स्वतःहून मदतीला धावून जाणं, तरुणांना मार्गदर्शन करणं, आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेणं. या सगळ्या गोष्टी आज ही ते तितक्याच उत्साहाने करत आहेत.सेवा हीच खरी संपत्ती आहे, आणि ही संपत्ती त्यांनी मनापासून उभी केली आहे.

अरुण श्रावण सोनवणे यांचा जीवनप्रवास म्हणजे एक प्रेरणादायी यशकथा आहे. जिथे संघर्ष आहे, जिद्द आहे, निष्ठा आहे, आणि माणुसकीचा दरवळ आहे. अशा व्यक्तिमत्त्वा समोर नतमस्तक व्हावेसे वाटते.

त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 
त्यांचा सेवाभाव नव्या पिढीला प्रेरणा देत राहो आणि
त्यांचे कार्य उद्याच्या उज्वल समाजासाठी दीपस्तंभ ठरो हीच सदिच्छा.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !